राहुल यांनी केली निर्मला सीतारामन यांच्या राजीनाम्याची मागणी

आता एचएएलच्या आर्थिक स्थितीवरून जुंपली ; सीतारामन यांनीही केला प्रतिवाद

नवी दिल्ली: सरकारी मालकीच्या हिंदुस्थान ऍरोनॉटिक्‍स लि (एचएएल) या कंपनीचा सध्या झालेल्या बिकट आर्थिक स्थितीवरून कॉंग्रेसने सरकारला घेरले आहे. या कंपनीची आर्थिक स्थिती केवळ सरकारच्या अनास्थेमुळे बिकट झाली असून कंपनीवर एक हजार कोटी रूपयांची उधारउसनवारी करण्याची वेळ आली आहे असे वृत्त एका राष्ट्रीय वृत्तपत्राने दिले होते. तो मुद्दा पुढे करीत राहुल गांधी यांनी आज निर्मला सीतारामन यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत बोलताना एचएएल कंपनीला सरकारने एक लाख कोटी रूपयांचे कंत्राट दिले असल्याचे सांगितले होते. ही कंत्राटे दिल्याचे सिद्ध करा अन्यथा राजीनामा द्या असे थेट आव्हान राहुल गांधी यांनी दिले.

त्यावर पुन्हा राहुल गांधी यांचा प्रतिवाद करताना निर्मला सीतारामन यांनी आता राहुल गांधी यांना एबीसी सुद्धा कळत नाही असे त्या म्हणाल्या. त्यांनी सांगितले की या कंपनीला कंत्राटे देण्याची प्रक्रिया सुरू आहे. ती सध्या विविध टप्प्यात आहेत. ती प्रक्रिया पुर्ण केली की या कंपनीला ही कंत्राटे दिली जातील. तथापी त्यांनी लोकसभेतील उत्तरात मात्र एचएएल कंपनीला एक लाख कोटी रूपयांची कंत्राटे दिली असल्याचा दावा केला होता. पण राहुल गांधी यांचा प्रतिवाद करताना कंपनीला ही कंत्राटे दिली जात असून त्याची प्रक्रिया सुरू असल्याचे म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी निर्मला सीतारामन यांचा दावा खोडून काढताना आज तगायत या कंपनीला एक रूपयांचीही ऑर्डर मिळालेली नाही असे कंपनीच्याच अधिकाऱ्यांचा हवाला देऊन स्पष्ट केले. दरम्यान या कंपनीला सप्टेंबर 2017 पासून सरकारची ऑर्डर मिळालेली नाही आणि कंपनीचे लष्कराकडून सुमारे सोळा हजार कोटी रूपयांची थकित रक्कम देण्यात आलेली नाही त्यामुळे कंपनीची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे असे वृत्त एका राष्ट्रीय दैनिकाने दिले आहे. त्यातून हे वादंग निर्माण झाले आहे. कंपनीला कर्मचाऱ्यांचा पगार करण्यासाठी एक हजार कोटी रूपयांचा निधी उसना घ्यावा लागल्याचे या वृत्तात म्हटले आहे. गेल्या तीन ते चार दशकांत कंपनीवर अशी वेळ कधीच आली नव्हती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)