राहुल द्रविडची “द्रोणाचार्य’साठी, कोहलीची “खेलरत्न’साठी शिफारस

नवी दिल्ली – मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कारासाठी सुनील गावसकर यांना कौल कोलकाता, दि. 26 – भारताचा महान फलंदाज आणि युवा क्रिकेट संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडची यंदाच्या मोसमासाठी देशातील सर्वोत्तम प्रशिक्षकाला देण्यात येणाऱ्या अत्यंत प्रतिष्ठेच्या “द्रोणाचार्य पुरस्कारा’साठी शिफारस करण्यात आली आहे. तसेच क्रीडाक्षेत्रातील सर्वोच्च अशा “खेलरत्न’ पुरस्कारासाठी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची दुसऱ्यांदा शिफारस करण्यात आली आहे.

भारताचे महान सलामीवीर व माजी कर्णधार सुनील गावसकर यांची “मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कारा’साठी शिफारस करण्यात आली असून भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे या शिफारशी करण्यात आल्याच्या वृत्ताला बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी दुजोरा दिला. बीसीसीआयने बऱ्याच वर्षांनी तीनही गटांसाठी शिफारशी पाठविल्याची माहितीही त्यांनी दिली.

एकाच यशस्वी खेळाडूसाठी अनेक प्रशिक्षकांनी दावा केल्याच्या प्रकारानंतर बीसीसीआयने द्रोणाचार्य पुरस्कारासाठी शिफारस करणे थांबविले होते. परंतु या वर्षारंभी राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली भारताच्या 19 वर्षांखालील संघाने विश्‍वचषक जिंकला. तसेच कुमार संघाने अंतिम फेरी गाठली. भारत अ संघाच्या चमकदार कामगिरीमागेही राहुल द्रविडचीच मेहनत आहे. परिणामी भारतातील ज्युनियर स्तरावरील क्रिकेट आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट यातील अंतर कमी झाले आहे. त्यामुळेच बंदीच्या नियमाला अपवाद करून राहुल द्रविडची शिफारस करण्यात आल्याचे राय यांनी सांगितले.

विराट कोहलीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी वैयक्‍त्ति स्तरावर अर्ज केल्यानंतर त्यांना द्रोणाचार्य पुरस्कार देण्यात आला होता. परंतु त्यांची शिफारस बीसीसीआयने केली नव्हती. तसेच खेलरत्न पुरस्कारासाठी विराट कोहलीची 2016 मध्येही शिफारस करण्यात आली होती. परंतु सिंधू, साक्षी मलिक व दीपा कर्माकर यांच्या रिओ ऑलिम्पिकमधील कामगिरीमुळे त्यांना खेलरत्न पुरस्कार देण्यात आला होता. आता कोहलीची पुन्हा एकदा अधिकृतरीत्या शिफारस करण्यात आली आहे.

 गावसकर यांचे असामान्य योगदान

जीवन गौरव पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आलेले “लिटल मास्टर’ सुनील गावसकर यांच्याबद्दल काही सांगण्याची गरज नाही. 1970 ते 80च्या दशकात भारतीय संघाने इंग्लंड व वेस्ट इंडीजमध्ये पहिल्यांदाच ऐतिहासिक विजय मिळविले. त्यात गावसकर यांच्या फलंदाजीचा मोलाचा वाटा होता. तसेच कसोटी क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा टप्पा पार करणारे ते जगातील पहिले फलंदाज होते.

त्याचप्रमाणे सर डॉन ब्रॅडमन यांचा 29 कसोटी शतकांचा विक्रम मोडणारेही ते पहिलेच फलंदाज होते. गावसकर व कपिल देव यांच्याकडून प्रेरणा घेऊनच क्रिकेटपटूंची पुढची पिढी उदयाला आली. समीक्षण आणि समालोचन या क्षेत्रातही गावसकर यांनी अनेक मानदंड प्रस्थापित केले. मैदानावरील कामगिरीबरोबरच निवृत्तीनंतर विविध क्षेत्रांतील कामगिरीमुळे गावसकर यांनी जगभरात आदराचे स्थान मिळविले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)