एकनाथ बागूल 

कॉंग्रेस पक्षाचे विशेष महत्त्व प्रतिपादन करताना राहुल गांधी यांनी, “हा पक्ष पुरोगामी तर आहेच, परंतु यापुढे पक्षामध्ये आत्मपरीक्षणाची प्रक्रियादेखील सतत चालू ठेवायची आहे. त्यासाठी जुने विचार आणि नवे विचार या लढाईऐवजी जास्तीत जास्त नव्या विचारांच्या तरुण व्यक्‍ती, सक्रिय कार्यकर्ते आदींना पक्षामध्ये प्रवेश देण्याची गरज आहे. कॉंग्रेस ही केवळ निवडणूक लढविणारी राजकीय संस्था नसून हा पक्ष म्हणजे देशाचा एक अनमोल वारसा असून तो एकात्म भारतासाठी जपलाच पाहिजे’, असेही त्यांनी सूचित केले आहे. 

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लोकशाहीमार्गाने स्वतंत्र भारताचा कारभार दीर्घकाळ सांभाळणाऱ्या महात्मा गांधी, पं. जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद आदी महान नेत्यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस पक्षाची गेल्या आठ-दहा वर्षांपासून पीछेहाट सुरू आहे. भारतासह परदेशातील धर्मनिरेपक्ष लोकशाहीवादी नागरिक आणि राज्यशास्त्राच्या अभ्यासकांमध्येही या विषयाबद्दल सातत्याने कुतुहलपूर्ण चर्चा सुरू आहे. परदेशात जाणाऱ्या भारतीय नेत्यांना तर त्याबद्दल हमखास प्रश्‍न विचारणाऱ्या स्थानिक नागरिकांमध्ये, पत्रकारांमध्ये आणि राजकीय विश्‍लेषकांमध्ये कॉंग्रेस पक्षाच्या या विद्यमान दुर्दशेची कारणे जाणून घेण्याची उत्कंठा आढळूून येत असते.

कॉंग्रेस पक्षाचे नवे अध्यक्ष राहुल गांधी प्रारंभी पक्षाचे उपाध्यक्षपद सांभाळू लागल्यापासून त्यांच्या परदेश भेटीगाठींमध्ये मुख्यतः तेथील विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी आवर्जून संवाद साधत असतात. गेल्या वर्षी सप्टेंबर माहिन्यामध्येच त्यांनी अमेरिकेत कॅलिफोर्नियामधील बर्कले विद्यापीठातील विद्यार्थ्यांची आवर्जून भेट घेतली होती. तेथील विद्यार्थ्यांनी त्यांना कॉंग्रेसच्या पराभवासंबंधी अनेक खोचक प्रश्‍न विचारले. त्यावेळी राहुल गांधींनी निःसंकोचपणे कबुली मनमोकळेपणाने देताना म्हटले होते की, “यूपीएच्या नेतृत्वाखालील राजवटीमध्ये विशेषतः दुसऱ्या पाच वर्षांच्या कारकिर्दीच्या प्रारंभापासून हळूहळू कॉंग्रेस पक्षामध्ये एकप्रकारचा अहंकार किंवा बेछूटपणा निर्माण झाल्याचे आढळू लागले. सत्ताधारी घटकांमधील परस्पर संवाद थांबला. अर्थातच सामान्य जनतेपासूनही त्यामुळे पक्ष दुरावू लागला.’

नंतर पक्षाचे अध्यक्षपद धारण केल्यानंतर त्यांनी गेल्या आठवड्यात शुक्रवारी सिंगापूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांनी मुख्यतः कॉंग्रेस पक्षाने सोपविलेल्या नव्या मोठ्या जबाबदारीचे महत्त्वही मनमोकळेपणाने नमूद केले. सिंगापूरच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनीही अर्थातच अमेरिकेतील विद्यार्थ्यांप्रमाणेच कॉंग्रेस पक्षाच्या वाताहतीसंबंधातील वस्तुस्थिती जाणून घेण्याची जास्त उत्सुकता दाखविली. नव्या दमाचे, आधुनिक विचाराचे तरुण कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी 2010 पासूनच पक्षाच्या नेतृत्वाखालील यूपीए आघाडी सरकारच्या काळात आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीमध्ये झालेल्या वाढीच्या पार्श्‍वभूमीवर एका केंद्रीय मंत्र्यांच्या पुत्राने इराकमधील तेल आयात व्यवहारात केलेल्या दलालीचा गाजलेल्या वादग्रस्त विषयाचा उल्लेख न करता, मोघमपणे ते प्रकरणच पक्षांतर्गत उद्रेकाच्या प्रारंभ ठरल्याचे सूचित केले.

कॉंग्रेस पक्षांतर्गत बेशिस्त किंवा मतभेद आणि प्रामुख्याने आधुनिक विचार आणि जुनी किंवा पारंपरिक विचारधारा यांचा संघर्ष तसेच भ्रष्टाचार अशा प्रमुख कारणांमुळे 2014 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षाच्या वाट्याला दारुण पराभवाची शिक्षा आली, असेही स्पष्ट आणि स्वच्छ शब्दांत राहुल गांधी यांनीच सिंगापूरच्या ताज्या भेटीत कबूल केले, हे येथे जास्त उल्लेखनीय वाटते. कॉंग्रेस पक्षाचे विशेष महत्त्व प्रतिपादन करताना राहुल गांधी यांनी, “हा पक्ष पुरोगामी तर आहेच, परंतु यापुढे पक्षामध्ये आत्मपरीक्षणाची प्रक्रियादेखील सतत चालू ठेवायची आहे. त्यासाठी जुने विचार आणि नवे विचार या लढाईऐवजी जास्तीत जास्त नव्या विचारांच्या तरुण व्यक्‍ती, सक्रिय कार्यकर्ते आदींना पक्षामध्ये प्रवेश देण्याची गरज आहे. कॉंग्रेस केवळ निवडणूक लढविणारी राजकीय संस्था नसून हा पक्ष म्हणजे देशाचा एक अनमोल वारसा असून तो एकात्म भारतासाठी जपलाच पाहिजे’, असेही यावेळी सूचित केले.

वास्तविक राहुल गांधींनी कॉंग्रेस या ऐतिहासिक राष्ट्रीय पक्षाची सूत्रे स्वीकारल्यानंतर दिलेल्या निःसंकोच कबुलीनंतर तरी देशभरातील पक्षाच्या संघटना बांधणीकडेदेखील त्यांच्या सहकाऱ्यांना लक्ष पुरवावे लागेल. अनिर्बंध राजकीय सत्तेच्या बळामुळे पक्ष संघटनेची वेगाने देशभर वाढ झाली. आरंभीच्या काळात कार्यकर्त्यांच्या मनावर निःस्वार्थ देशभक्‍ती, सहकार, सदाचार, समानता, सामाजिक न्याय आदी आदर्श विचारसरणीचा प्रभाव होता. धर्मनिरपेक्षता, लोकशिक्षण आणि जातीनिर्मूलन यासारखे विषय तसेच सहकार चळवळ, दारूबंदी, स्वयंरोजगार आदी प्रश्‍न कॉंग्रेस संघटनेच्या देशव्यापी विविध परिवारांनी निष्ठापूर्वक व सेवाव्रताच्या भावनेने राबविले.

सहकाराच्या माध्यमातून शेती, कारखानदारी, शिक्षण, आरोग्य आदी क्षेत्रांद्वारे सामाजिक कार्याचे आदर्श जागोजागी निर्माण केले. मात्र, यथावकाश त्या सर्व आदर्श उपक्रमांसाठी उभ्या राहिलेल्या भव्य दिव्य इमारतींमध्ये केवळ गटबाजी, चढाओढ, स्पर्धा, व अन्य मनमानी किंवा स्वार्थी कारस्थानांचे अड्डे उद्योगच आढळू लागले. पक्षाचे अनेक पदाधिकारी सत्ता आणि पैसा आणि पैशातून सत्ता व सत्तेतून पैसा या दुर्दैवी चक्रातच अडकल्याचे वातावरण निर्माण झाले.
लोकशाहीमध्ये कोणत्याही राजकीय संघटनेच्या अस्तित्वामध्ये मूळ ध्येयवादाची निःस्वार्थपणे काटेकोरपणे जोपासना करावयाची असते. त्यासाठी पक्षाच्या संबंधित विचारधारेशी संघटनेतील बांधिलकी पदाधिकाऱ्यांची अविचल निष्ठा, बांधिलकी अत्यावश्‍यक असते. जगाच्या पाठीवरील अगदी मोजक्‍या लोकशाहीवादी राजकीय पक्षांनी सातत्याने याच भावनेने कारभार सांभाळला. त्यामुळे त्यांच्या हातून व्यापक समाजहित आणि देशाच्या सर्वांगीण प्रगतीबरोबरच जागतिक प्रतिष्ठाही प्राप्त करून घेण्याचे त्यांना भाग्य लाभले हे येथे विसरून चालणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)