राहुरी शहरासह तालुक्‍यात बंदला उर्त्स्फूत प्रतिसाद

राहुरी - येथे जागरण गोंधळ करून शासनाचा निषेध नोंदविण्यात आला.

आठवडे बाजारही बंद : शाळा, महाविद्यलयांना सुटी; नगर-मनमाड महामार्ग ओस

राहुरी – राहुरी शहरासह तालुक्‍यात मराठा क्रांती मोर्चाच्या महाराष्ट्र बंदला उर्त्स्फूत प्रतिसाद मिळाला. सर्वत्र शुकशुकाटाचे वातावरण दिसत होते. आज शहरात भरणारा मोठा आठवडे बाजारही बंद ठेवण्यात आला होता. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने शाळा व महाविद्यालयांना सुटी जाहीर केली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मराठा आरक्षण या प्रमुख मागणीसाठी पुकारलेल्या बंदला तालुक्‍यातील विविध सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला होता. शांततेत झालेल्या आजच्या बंदमुळे एरव्ही गजबजलेला नगर-मनमाड हा प्रमुख महामार्ग अक्षरशः ओस पडल्याचे चित्र पहावयास मिळाले. मालवाहतूक करणाऱ्या चालकांनी आपापली वाहने रस्त्याच्या कडेला वा ढाब्यावर उभी करून आराम करणे पसंत केले. रस्त्याच्या कडेची हॉटेल व ढाबेवाल्यांनी आपले व्यवसाय पूर्णत: बंद ठेवल्याने परराज्यातील प्रवाशांना बंदचा फटका बसला.

सकाळी तालुक्‍यात मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी गावागावात रास्तारोको व बंद ठेवून सर्वांनी 11 वाजता राहुरी येथील संपूर्ण दिवसभर होणाऱ्या रास्ता रोकोत सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्याद्रुष्टीने कोल्हार खुर्द, राहुरी कारखाना, महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे समाजाच्या वतीने रास्तारोको करून कार्यकर्ते शहरात दाखल झाले. तेथे पंचायत समितीपासून मोर्चाला सुरुवात झाली. यावेळी विविध घोषणांनी शहर दुमदुमून गेले होते.
चिंचोली येथील मोर्चेकरी राहुरी येथील आंदोलनात सहभागी न होता आज दिवसभर चिंचोलीतच बंद ठेवून रस्त्यावर ठिय्या देऊन बसले होते.

सरपंच गणेश हारदे यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले. येथूनही रुग्णवाहिका व संरक्षण संबंधित वाहने मार्गस्थ करण्यात येत होती. श्रीकांत गागरे महाराज यांचे कीर्तन व भजनाचा कार्यक्रम रस्त्यावर सुरू होता. मधूनमधून नामवंतांची व्याख्याने होत होती. प्रवाशांना, कार्यकर्त्यांनी चहा नाश्‍त्याचीही व्यवस्था केली होती. तालुक्‍यातील वांबोरी, देवळाली प्रवरा, टाकळीमिया, सोनगाव, सात्रळ, मांजरी या मोठ्या गावांसह ग्रामीण भागात कडकडीत बंद पाळण्यात आला. बंद दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी समन्वयक वारंवार आवाहन करीत होते.

पोलीस निरिक्षक अविनाश शिळीमकर यांनी मोठा फौजफाटा शहर व ग्रामीण भागासह रस्त्यावर ठेवला होता. स्वतः तालुक्‍यात फिरून ते परिस्थितीचा आढावा घेत होते. तहसीलदार अनिल दौंडे यांनी महसूल पथकाचे कर्मचारी ठिकठिकाणी नेमून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले. दुय्यम निबंधक दौलत घोडके व नायब तहसीलदार ए. एम. डमाळे महसूल विभागाच्या वतीने चिंचोली येथे दिवसभर ठाण मांडून आपत्कालीन विभागाला अवगत करीत होते.

देवशभक्‍तीपर गीते, शिवव्याख्यान…

प्रथम साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून जुन्या बसस्थानक परिसरातील बालाजी मंदिरासमोर नगर-मनमाड महामार्गावर संपूर्ण दिवसभर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवशाहीर विजय तनपुरे यांचे व्याख्यान, अजित येवले यांची देशभक्‍तीपर गीते, राहुल पेरणे यांचे शिवव्याख्यान झाले. त्यानंतर रस्त्यावरच जागरण गोंधळाचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी खिचडी शिजवून मोर्चेकऱ्यांची जेवणाची व्यवस्थाही करण्यात आली होती. चक्‍काजाम आंदोलनादरम्यान रुग्णवाहिका व मिलिटरीच्या वाहनांना मार्गस्थ करण्यात येत होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)