राहुरी शहरात 27 गोवंश जनावरांची मुक्‍तता 

श्रीरामूपर-राहुरी पोलिसांची संयुक्‍त कारवाई : 3 लाख 87 हजाराच्या मुद्देमालासह दोन आरोपी ताब्यात
राहुरी – श्रीरामपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे व पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या संयुक्‍त पथकाने आज पहाटे 5 वाजता राहुरी शहरात संशयित वाहनाच्या तपासणीत 27 गोवंश जातीची जनावरे व पिकअप यासह जवळपास 3 लाख 87 हजाराच्या मुद्देमालासह दोन आरोपी ताब्यात घेतले आहेत. राहुरी तालुक्‍यात प्रथमच इतक्‍या मोठ्या प्रमाणात कत्तलीसाठी जात असलेली जनावरे ताब्यात घेण्याची कारवाई झाली. याप्रकरणी राहुरी पोलिसात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी वाकचौरे व पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन करण्याचे ठरविण्यात आले होते. त्यानुसार दि. 23 रोजी रात्री 2-30 वाजेच्या सुमारास शहरात फरारी आरोपी शोधमोहीम राबवित असताना कानिफनाथ चौक राहुरी येथे एक पिकअप नंबर एम. एच. 13 ए. एन. 0717 असा नंबर असलेली पांढऱ्या रंगाची संशयित गाडी थांबलेली दिसली. तेव्हा पोलीस पथकाने चालकाला गाडीमध्ये काय आहे असे विचारले असता त्याने प्लास्टिक ड्रम असल्याचे सांगितले. पथकाने गाडीची तपासणी केली असता गाडीमध्ये ड्रमच्या खाली एक गोवंश जातीचे जनावर निर्दयतेने हालहाल होतील, अशा अवस्थेत चारपाय बांधलेल्या स्थितीत आढळून आले. तेंव्हा सदर चालकास व त्याच्या सोबत असलेल्या इसमास त्यांचे नावगाव विचारले असता त्यांनी मुख्तार मुश्‍ताक कुरेशी (वय 28) व मुन्नावर फकीर सय्यद (वय 32 रा. खाटिक गल्ली, राहुरी) असे सांगितले. त्यांना गोवंश प्राणी कोठे घेऊन जात आहात याबद्दल विचारले असता त्यांनी कत्तलीसाठी नेत असल्याचे सांगितले.
पोलीस पथकाचा संशय आणखी बळावत असल्याने त्यांनी या घटनेची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी वाकचौरे व निरीक्षक वाघ यांना दिली. त्यांनी आणखी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलीस पथक आरोपींच्या राहत्या घरी खाटीक गल्ली मटन मार्केटच्या मागील मोकळ्या जागेत पोहोचले असता या जागेत आणखी गोवंश जातीची जनावरे दाटीवाटीने बांधलेल्या अवस्थेत दिसली. ही सर्व जनावरे कत्तलीसाठी आणल्याची कबुली आरोपींनी दिली. त्यात 80 हजार रुपये किमतीची 8 मोठे बैल तांबड्या काळ्या व पांढऱ्या रंगाचे पिकअपमध्ये आढळून आले तर 57 हजार रुपये किमतीची 19 लहान जनावरे त्यात 6 जनावरे दोन महिने वयाची तर 13 जनावरे एक ते दीड वर्ष वयाची तसेच 2 लाख 50 हजार रुपये किमतीची महिंद्रा कंपनीची पांढऱ्या रंगाची पिकअप असा एकूण 3 लाख 87 हजार रुपयांचा मुद्देमाल व सोबत दोन आरोपीना ताब्यात घेतले आहे.
जनावरांना राहुरी कारखाना परिसरातील गोशाळेत संगोपनासाठी ठेवण्यात आले आहे. यासंदर्भात राहुरी पोलीस स्टेशनला पो. कॉं. शिवाजी वामन खरात यांच्या फिर्यादीवरून प्राण्यांना क्रुरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम 1960 चे कलम 11 व महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 चे कलम 5, 9 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी वाकचौरे व पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्यासह राहुरी पोलिस स्टेशनचे रमिज आत्तार, रविंद्र मेढे, आव्हाड, थोरमिसे, डी. बी. जाधव, वाघस्कर, गुलाब माटे, महेश भवर, महेंद्र गुंजाळ, मनोज राजपुत, बोडखे, ताके, राज्य राखीव पोलीस दल पुणेचे महेश कदम, संदीप जगदाळे, तान्हाजी बोऱ्हाटे, राजकुमार डगळे, सुनील यादव, होमगार्ड राजेश पानसंबळ यांनी सहभाग घेतला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)