राहुरी तालुक्‍याला गतवैभव मिळणार का? 

रेल्वे, विमान, रस्ते, इंटरनेट, आदी दळणवळण साधनांमुळे कोसो दूर असलेली गावखेडी एकमेकांना जोडली गेली. दळणवळण साधनांनी जोडलेल्या गावांचा विकासही सुसाट होऊ लागला आहे. शहरी, ग्रामीण भागातील देवाण-घेवाण होऊन लोकांचे राहणीमानही उंचावले असून, असाच एक जिल्ह्यातील दळणवळण साधनांचा रंजक मागोवा… 

एकेकाळी राज्याच्या राजकारणाला दिशा देणारा तालुका म्हणून ओळख असणाऱ्या राहुरी तालुक्‍याची तेव्हाची ओळख आता पुसटशी झाल्याची प्रचिती येते. जिल्ह्यात प्रगत बागाईत म्हणून हा तालुका संबोधला जायचा. अन्य पिकांबरोबरच उसाचे प्रमुख आगर येथे होते. ते थोड्याफार प्रमाणात आजही कायम आहे. तालुक्‍याच्या हक्काचे व उशाशी विस्तीर्ण मुळा धरण हे तालुक्‍याच्या दक्षिण-पूर्व भागाची तर अकोले तालुक्‍यातील भंडारदरा धरण हे तालुक्‍याच्या उत्तर-पश्चिम व पूर्व भागाची जीवनवाहिनी. माणसाबरोबरच प्राणिमात्रांची व शेतीची तहान भागविणाऱ्या प्रमुख धरणांचा वरदहस्त तालुक्‍यावर राहिला. त्यामुळेच उसाचे आगर सर्वपरिचित झाले. तालुक्‍यात जुनेजाणते सर्वच पक्षांतील मातब्बर पुढारी पक्षातून वेगळे असले तरी तालुक्‍याच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी तालुक्‍याबरोबरच राहिल्याचा इतिहास सांगतो.

म्हणूनच महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी साखर कारखाना, सूतगिरणी, आशिया खंडातील पहिली सहकारी वीजवितरण कंपनी मुळाप्रवरा सहकारी वीज संस्था, मुळा धरण यासारखे विकासाचे सारथ्य करणारे प्रकल्प साकारल्याची नोंद तालुक्‍याचा इतिहास सांगतो. त्यातून पुढे विकासाची खरी मुहुर्तमेढ रोवली गेली. मग त्यात आमदार का. ल. पवार, डॉ. दादासाहेब तनपुरे, आमदार पी. बी कडू पाटील, अलीकडे रामदास धुमाळ, दूददृष्टी व विकासात्मक दृष्टी असलेले नेतृत्व लाभले की विविधांगी विकासांच्या स्वप्नांना पंख फुटतात. याचेच मूर्तीमंत उदाहरण गत नेतृत्वात दिसून आले. त्यातून जमीन सुधारणा, पाणी नियोजनासाठी व व्यवस्थापनासाठी बांधापर्यंत शेतचाऱ्यांची निर्मिती व परंपरागत शेतीतून आधुनिकतेची कास जपत असताना यांत्रिक शेतीचा प्रयोग सर्वप्रथम तालुक्‍याने केला,अनुभवला. त्यातूनच शाश्वत शेतीचा प्रयोग राज्याला दिला. म्हणूनच सुजलाम सुफलामचे अर्ध्याहून अधिकचे स्वप्न तालुक्‍याने पाहिले व प्रत्यक्ष साकारले.

हवे सक्षम नेतृत्व 
तालुक्‍याच्या छोट्या-मोठ्या गरजांना ओळखून त्या अधोरेखित करणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे. तालुक्‍यात अनेकांच्या अंगी ते गुण आहेत. परंतु त्यासाठी तालुकावासीयांचा विश्वास कमावणेही महत्वाचे आहे. तालुक्‍याला सत्तास्थान फिरती ठेवण्याची परंपरा आहे. नव्या फळीतील तरुण नेतृत्व त्यादृष्टीने यशस्वी होताना दिसते.

सत्तेत कोणीही असो, तालुक्‍याचा कायापालट करण्याचा ध्यास घेतलेले नेतृत्व, सरकारच्या विविध योजना आणून त्या तालुक्‍यात रूजविण्याचे, मोहोरविण्याचे काम गतकाळात झाले. त्याचीच फळे आत्तापर्यंतची पिढी चाखत आली. त्याकाळच्या विकासाचा रथ शक्‍य असेल तर पुढे न्या, कोणत्याही परिस्थितीत मागे नेवू नका असा जुन्याजाणत्यांनी दिलेला संदेश काळाच्या ओघात मधली पिढी विसरली. त्यामुळे विकास थांबला. त्याला कारणेही अनेक असली तरी एकेकाळी सधन असलेल्या व उसाचे आगर म्हणून ओळख असलेल्या तालुक्‍यावर जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील अनेकांच्या नजरा होत्या. उसाचा झोनबंदी कायदा उठल्यानंतर मात्र तालुक्‍याचे सोने असणाऱ्या उसाची जिल्ह्यातून ओरबड सुरू झाली. त्यात तालुक्‍यातील काही पुढाऱ्यांनाही हाताशी धरले गेले. यातून ऊस उत्पादक व शेतकरी अक्षरशः भरडला, ओरबाडला व नागवला गेला. त्यातच तालुक्‍याची कामधेनू असलेला साखर कारखाना बंद पडला तर सोन्याहून पिवळे म्हणून त्यासाठी अंतर्गत व बाहेरून प्रयत्न झाले हे सर्वश्रुत आहे. पर्यायाने कामधेनूचा अस्त झाला.

त्यावर अबलंबून असलेल्या व्यावसायिकांचेही कंबरडे मोडले. त्याबरोबर नुकतीच बाळसे धरत असलेली मिनी एमआयडीसी सलाईनवर आली. रोजगाराचे आणि विकासाचे केंद्रच बंद झाल्याने अनेक घटक निराधार झाले. जोडीला असलेल्या अनेक संस्थाही मोडकळीस आल्या. ज्यातून सत्ताकेंद्राचा मार्ग जातो, तोच बंद झाल्याने स्थानिक नेतृत्वही निष्प्रभ झाले. पर्यायाने तालुक्‍याला उसण्या नेतृत्वावर अवलंबून राहावे लागले.त्यात नंतर मतदारसंघाची पुनर्रचना झाल्याने तालुक्‍याचे दोन तुकड्यांत विभाजन झाले. देवळाली महसूल मंडळातील प्रवरा काठावरील 32 गावे श्रीरामपूर विधानसभेला जोडली गेली. या 32 गावांना श्रीरामपूर तर उर्वरित तालुक्‍याला नगरकरांवर अवलंबून राहण्याची वेळ आली. घरातील कुटुंबप्रमुख गेल्यानंतर घराचे वासेही फिरतात. तीच परिस्थिती तालुक्‍याची झाली. पुतनामावशीचे प्रेम वरवरचे असते हे या आजवरच्या सर्व घडामोडीवरून लक्षात येते. सक्षम नेतृत्वाची आज तालुक्‍याला गरज आहे.

कारखाना सुरू झाल्याने उभारी 
यंदा स्थानिकांच्या मदतीने व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सोबत घेऊन प्रत्यक्ष कारखाना सुरू झाला हे डॉ. सुजय विखेंचे दमदार पाऊलच म्हणावे लागेल. देशोधडीला लागलेल्या कामगारांच्या चुली यामुळे पेटत्या झाल्या. अनेक कुशल-अकुशल कारागिरांच्या छोट्या-मोठ्या उद्योगांना यामुळे उभारी आली. कारखाना सुरू झाल्याने एकप्रकारे तालुक्‍याला संजीवनी मिळाली.

तालुका नेहमी राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेससोबत राहिला आहे. तालुक्‍याचे महत्त्वाचे पंचायत समितीचे सत्तास्थान राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. नुकत्याच तीन टप्प्यांत झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांतही राष्ट्रवादीला जनतेने स्वीकारले आहे. नुकत्याच झालेल्या हल्लाबोल आंदोलनाच्या सभेने तालुक्‍यात चैतन्य निर्माण केले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे शिवाजी गाडे यांना तालुक्‍याने स्वीकारल्याचे दिसले. त्यादृष्टीने प्राजक्त तनपुरे यांनी आतापासूनच तयारी सुरू केलेली दिसत असून त्याला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळत आहे. भागडा चारी, वांबोरी चारी या प्रश्नावर त्यांनी तोडगा काढून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. तीही जमेची बाजू म्हणता येईल. त्यादृष्टीने वर्षभरावर येऊन ठेपलेल्या निवडणुकांपुर्वी बहुआयामी नेतृत्व निर्माण होईल अशीच अपेक्षा ठेऊया.

 

 

बाळकृष्ण भोसले 
राहुरी


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)