राहुरी तालुक्‍यातील दिग्रसमध्ये सर्रास वाळूउपसा सुरू

नगर – वाळू लिलावाची प्रक्रिया ठप्प झाली असतानाही जिल्ह्यात मात्र सर्रास वाळूउपसा सुरू आहे. परवानगी नसतानाही अनधिकृतपणे हा वाळूउपसा होत आहे. राहुरी तालुक्‍यातील दिग्रस परिसरात तर गेल्या दोन महिन्यांपासून वाळूउपसा सुरू असून त्यावर कोणाचाच लगाम नसल्याने मनमानी पद्धतीने हा उपसा सुरू आहे. राजरोज वाळू चोरली जात असतानाही प्रशासन काहीच करू शकत नाही. हतबलतेने या यंत्रणेला बघ्याची भूमिका घ्यावी लागत असल्याने आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे.

दरम्यान, या वाळू वाहतुकीमुळे नगर-मनमाड रस्त्याची पुरती वाट लागली असून त्याचा त्रास वाहनचालकांना होत आहे. राहुरी तालुक्‍यातील दिग्रस परिसरातील मुळा नदीच्या पात्रातून गेल्या दोन महिन्यांपासून हा बेकायदा वाळूउपसा होत असून, दररोज 60 ते 70 वाहनांच्या माध्यमातून वाळू चोरी होत आहे. वाळू चोरी होत असल्याचे ग्रामस्थांसह तालुका व जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांना माहिती असतानाही या वाळू चोरीच्या विरोधात कारवाई होत नाही. ग्रामपंचायतीकडून या वाळू उपशाला विरोध होत नाही. तसेच, रस्त्याने मोठ्या प्रमाणावर वाळू वाहतूक होत असताना त्यांना कोणी रोखत नाही. त्यामुळे या वाळू चोरीचे गणित कोणालाच उलगडत नाही.

-Ads-

सुट्टीच्या दिवशी तर सकाळपासून हा वाळूउपसा होत असून 100 च्या वर वाहनांमधून वाळू चोरी होत आहे. याकडे तालुकास्तरावरील यंत्रणेकडून केवळ बघ्याची भूमिका घेतली जात आहे. ही वाळू चोरी रोखण्याचा कोणीच प्रयत्न करीत नाही यामुळे आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे. तहसीलदारांकडून या चोरीला अभय दिले जात असल्याची चर्चा आहे. यंत्रणेसमोर सर्रास वाळूउपसा होऊनही वाळू चोरली जात असताना हतबलतेने हे सर्व पाहिले जात आहे. यामुळे शासनाचा दररोजचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असून त्याबाबत गौणखनिज विभागाकडूनही दखल घेतली जात नाही. याबाबत जिल्ह्याबाहेरील काही प्रवाशांनी नाराजी व्यक्‍त केली आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)