कवठे – वाई तालुक्याच्या पूर्व भागात शेतीसाठीच्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असल्याने यंदा शेतकरी पेरणी करण्यासाठी धजावत नव्हता. पावसाचे अत्यल्प प्रमाण व त्यामुळे आ वासून उभा राहिलेला दुष्काळ व त्यातच पेरणीसाठी होत असलेला भरमसाठ खर्च यामुळे पैसे खर्च करून पेरणी केली आणि पिक नाही आले तर? या शंकेने या परिसरातील शेतकरी जमीन पेरण्यास टाळाटाळ करीत होता.
या कालावधीमध्ये राहुरी कृषी विद्यापीठ राहुरी यांच्यामार्फत नवीन पेरणी यंत्रांची चाचणी करण्यासाठी या भागातील शेतकऱ्यांच्या जमिनीची निवड करण्यात आली. त्यासाठी आदर्श युवक शेतकरी बचत गट कवठे व दत्तकृपा ऍग्रो इंजीनिअरिंग वर्क्स गोवेदिगर या संस्थेने पुढाकार घेतला. या संस्थांच्या माध्यमातून कवठे, सुरूर व खानापूर या परिसरातील ज्या शेतकऱ्यांनी मागणी केली. अशा सर्व शेतकऱ्यांच्या जमिनी विनामोबदला पेरून देण्यात आल्या. यामध्ये प्रामुख्याने ज्वारी, गहू, हरभरा या पिकांची प्रती शेतकरी एक ते तीन एकर या प्रमाणात जमिनी मोफत पेरून देण्यात आल्या.
यासाठी राहुरी कृषी विद्यापीठाचे अधिकारी प्रशांत ढोकणे, दत्तकृपा इंजिनिअरिंगचे मालक विठ्ठल गाडेकर, मॅनेजर शरद पिसाळ, बाजीराव पोळ, आत्माराम सुतार, शिवाजी जगताप तसेच आदर्श शेतकरी बचत गटाचे सचिन करपे, सतीश लोखंडे, नितीन करपे, संदीप पोळ, विशाल डेरे, किरण पोळ, अविनाश चव्हाण, गणेश पोळ, संतोष ससाणे, उमेश लोखंडे, माणिक करपे, राजेंद्र पोळ, नामदेव पोळ, किरण लक्ष्मण पोळ, गिरीश पोळ व प्रशांत जाधव यांनी या परिसरातील पेरणीसाठी विशेष परिश्रम घेतले.
दुष्काळाने कंबरडे मोडलेल्या या परिसरातील शेतकऱ्यांच्यासाठी दत्त इंजिनिअरिंग गोवेदिगर यांनी राहुरी कृषी विद्यापीठामार्फत या परिसरात मोफत पेरणी करून दिल्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना सहकार्य झाले. या सहकार्याने दुष्काळात लोकांना दिलासा मिळाला आहे. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी असेच उपक्रम राबविल्यास शेतकऱ्यांना सहकार्य होईल. सचिन महादेव करपे, शेतकरी कवठे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा