राहुरीतील 28 शाळांच्या 57 वर्गखोल्या धोकादायक

चिमुरड्यांचे शिक्षण झाडांखाली, मंदिरे, समाजमंदिरांमध्ये
राहुरी – तालुक्‍यातील जिल्हा परिषदेच्या 28 प्राथमिक शाळांमधील 57 वर्गखोल्या धोकादायक अवस्थेत आहेत. वर्षानुवर्षे याच अवस्थेत तेथे वर्ग भरवले जात होते.
डिजिटलचा आग्रह धरणाऱ्या काळात चिमुरड्यांना बसण्यासाठी झाडे, समाजमंदीर अथवा इतर मंदिरांचा आधार घ्यावा लागत आहे. जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढत असताना वर्गखोल्या मात्र धोकादायक बनल्या आहेत. नवीन वर्गखोल्या उभारणीसाठी वर्षानुवर्षे वाट पाहण्याची वेळ पालकांवर आली आहे.
जिल्हा परिषद प्रशासन निंबोडी दुर्घटनेच्या पुनरावृत्तीची वाट पाहतेय की काय, असा सवाल पालक करत आहेत.
तालुक्‍याचा पश्‍चिम – उत्तरेकडील बराचसा भाग डोंगराळ पट्ट्यात येतो. या भागात वाड्यावस्त्यांवर शाळा भरवल्या जातात. जवळच्या अंतरावर शिक्षणाची व्यवस्था व्हावी म्हणून आता छोट्या वस्त्यांवर शाळांची उभारणी करण्यात आली. त्यात पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग भरतात. त्या वर्गखोल्यांच्या बांधकामाला 50 वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. हे बांधकाम दगडी स्वरूपात आहे. जुनाटपणामुळे या बांधकामाला तडे गेले आहेत. त्यातील काही भाग ढासळलाही.
या अवस्थेतल्या वर्गखोल्यांमधून विद्यार्थी शिक्षण घेत होते . परंतु निंबोडी दुर्घटना घडल्यापासून विद्यार्थ्यांना अन्यत्र बसवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात समाजमंदिर, देवालये, व्हरांडे तर झाडाखाली बसण्याचाही पर्याय निवडण्यात आला.
देवळाली प्रवरा येथे ढुस वस्तीवरील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी चक्क झाडाखाली बसावे लागते. काही ठिकाणी नवीन इमारती बांधल्या गेल्या परंतु लगतच जुनी जीर्ण झालेली इमारत उभी आहे. या इमारती भोवती विद्यार्थी मधल्या सुट्टीत खेळत असतात. अशावेळी काही दुर्घटना घडल्यास काय, असा प्रश्‍न उपस्थित होतो. ग्रामपंचायतींनी वेळोवेळी ठराव करुन या धोकादायक इमारती पाडून टाकण्याची मागणी केली. निंबोडी दुर्घटनेला जुलै महिन्यात वर्ष होईल, पण जिल्हा परिषद प्रशासन अजूनही ढिम्मच आहे.
तालुक्‍यात जिल्हा परिषद शाळांचे 14 केंद्र आहेत. पहिली ते 7वी पर्यंत (उच्च प्राथमिक) शिक्षण देणाऱ्या जिल्हा परिषदेच्या तब्बल 33 शाळा आहेत. तालुक्‍यातील आंबी, ढुस वस्ती, देवळाली प्रवरा, रामपूर, चिंचाळे, गडधे आखाडा, शेरी, आग्रेवाडी, कात्रड, पुलवाडी, नवले वस्ती, वांबोरी स्टेशन, धामोरी खुर्द, सजनवाडी, खडांबे खुर्द, खडांबे बुद्रुक, सडे, खडकवाडी, कणगर, वडनेर, गणेगाव, गंगापूर, देसवंडी, मालुंजे खुर्द, लाख, डुक्रे वस्ती, कानडगाव, माळेवाडी या शाळांमधील वर्गखोल्यांची संख्या 121 इतकी आहे. त्यात वापरात असणाऱ्या खोल्या 64 आहेत. धोकादायक खोल्यांची संख्या 57 आहे . एकूणच शिक्षणाबाबतीत अग्रेसर असलेल्या तालुक्‍यात आज हे भयानक वास्तव आहे.

शाळांवर वीजतारांची टांगती तलवार…
तालुक्‍यात 3 शाळांच्या आवारात विजेचे रोहित्र आहेत तर 34 शाळांच्या आवारावरून विविध दाबांच्या वीजवाहिन्या गेल्या आहेत.
चिंचोलीतील भटारर वस्ती शाळेच्या आवारावरून अतिउच्चदाब वीजवाहिनी गेली आहे . ती दोनवेळा शाळेच्या आवारावरच तुटून पडली. परंतु विद्यार्थी दोन्ही वेळेस वर्गात असल्याने मोठी दुर्घटना टळली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)