राष्ट्रीय सौर ऊर्जा प्राधिकरणाची स्थापना करावी !

– खासदार श्रीरंग बारणे यांची खासगी विधेयकाद्वारे लोकसभेत मागणी

पिंपरी – जीवाश्‍म इंधनाच्या ज्वलनामुळे दिवसेंदिवस वाढत जाणारे प्रदूषण आणि त्याचा ग्लोबल वॉर्मिंगवर होणारा परिणाम यावर नियंत्रण ठेवण्यासाठी राष्ट्रीय सौर ऊर्जा प्राधिकरणाची स्थापना करून सौर उर्जेला तसेच सौर उर्जेवर चालणाऱ्या उपकरणांचा वापर करण्यास चालना द्यावी, जेणेकरून वाढत जाणाऱ्या ग्लोबल वॉर्मिंगवर नियंत्रण राहील आणि पर्यावरणाचे संरक्षण होईल, अशा आशयाचे खासगी विधेयक खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत सादर केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जागतिक हवामानशास्त्र संस्थेच्या एका अहवालानुसार 2007 मध्ये हवामान बदलाच्या मालिकेमुळे जगामध्ये बऱ्याच घटकांवर याचा परिणाम झाला आहे. संशोधनानुसार, सद्य स्थितीत हवामानातील अनिश्‍चितता वाढली असल्याने 1998 नंतरच्या तुलनेत मागील पाच वर्षापासून उष्णतेची पातळी दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये मानवी क्रियांमुळे म्हणजेच जीवाश्‍म इंधनाचे अमर्याद ज्वलन करण्यामुळे निसर्गाला अपायकारक असणारे वायू उत्सर्जित होतात आणि यामुळे जागतिक तापमानवाढ ही मोठ्या प्रमाणावर होत आहे.

वाढत्या लोकसंख्येमुळे आणि दरडोई उत्पन्नात वाढ झाल्याने नागरीक इंधनावर चालणाऱ्या विविध प्रकारच्या उपकरणांचा वापर मोठ्या प्रमाणावर करीत आहे. अशा उपकरणांमधून उत्सर्जित होणारा कार्बन डायऑक्‍साईड हा पर्यावरणासाठी घातक असल्याने याचा परिणाम जागतिक तापमान वाढीवर होत आहे. जागतिक तापमान वाढ रोखण्यासाठी व पर्यावरणाच्या संरक्षणासाठी सौर ऊर्जेचा वापर व विकास करणे अत्यावश्‍यक आहे, हे ध्यानात घेत खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत खाजगी विधेयक सादर केले.

या विधेयकात नमूद करण्यात आले आहे की, आपल्या देशात सौर ऊर्जेची प्रचंड क्षमता आहे. अंदाज पत्रकानुसार मेगा वॅट पवन ऊर्जा क्षमता जवळपास 4500 मेगावॅट असून टर्बाइनच्या युनिट आकारात वाढ, जास्त जमीन उपलब्धता आणि विस्तारीत वारा संसाधनांचे अन्वेषण, या संभाव्य पाहता यामध्ये लक्षणीय एक लाख मेगावॅट पर्यंत क्षमता वाढवायला पाहिजे. त्याचबरोबर आपल्या देशात सौरऊर्जेपासून होणाऱ्या वीजनिर्मितीचे संभाव्य मूल्यांकन करणे आवश्‍यक आहे. सौरऊर्जेसाठी आपल्या देशातील वाळवंटी क्षेत्रातील रेडिएशनची आवश्‍यकता आहे. एक 60 बाय 60 किलोमीटरचे क्षेत्र जवळपास लाख मेगा वॅट वीज क्षमता निर्माण करू शकते. आपल्या देशात गुजरात आणि राजस्थानातील वाळवंटी प्रदेश जवळपास 208110 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आहे, त्यापैकी केवळ 15000 चौ. कि.मी. वाळवंट वापरली तर जवळपास तीन लाख मेगावॅट वीज तयार करू शकतो.

आपण बायोगॅस निर्मिती करण्यासही सक्षम आहोत. अशा नैसर्गिक उर्जेचा वापर जास्तीत जास्त करण्यासाठी तसेच दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या ग्लोबल वॉर्मिंगवर नियंत्रण ठेवण्यासाठी राष्ट्रीय सौर ऊर्जा प्राधिकरणाची स्थापना करून सौर उर्जेला तसेच सौर उर्जेवर चालणाऱ्या उपकरणांचा वापर करण्यास चालना द्यावी, अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी विधेयकाद्वारे लोकसभेत केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)