“राष्ट्रीय सेवा योजनेचे ब्रीदवाक्‍य विद्यार्थ्यांनी अंगीकारावे’

पुणे, दि.30 – स्वयंप्रेरणा, स्वयंशिस्त, नि:स्वार्थपणा आणि समर्पीत भावनेने राष्ट्राला वाहिलेली सेवा म्हणजे राष्ट्रीय सेवा. राष्ट्रीय एकात्मता हा राष्ट्रीय सेवा योजनेचा एक अविभाज्य घटक आहे. “नॉट मी बट यु’ या राष्ट्रीय सेवा योजनेचे ब्रीदवाक्‍य विद्यार्थ्यांनी अंगीकारून राष्ट्रसेवेला समर्पीत करून घ्या, असे आवाहन कावेरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. बी. खरोसेकर यांनी केले आहे.

कन्नड संघाच्या कावेरी कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग उद्‌घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उपप्राचार्य सुस्मिता मोहंती, प्रा. सचिन देवकाते, प्रा. निलेश नेमाडे यासह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि एस.एस.एस गिताने झाली.

समाजातील उपेक्षित आणि दुर्लक्षित घटकांना मदत करण्याचे सत्कार्य स्वयंसेवक करीत आहेत. एन.एस.एस.मुळे स्वयंसेवक महाविद्यालयाचे ब्रॅंड अँबेसिडर बनले असून, त्यांच्यामध्ये आत्मविश्‍वास, नेतृत्व, कौशल्य, सामाजिक बांधिलकी वाढण्यास मदत होते, असे मत संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांनी व्यक्त केले. प्रास्ताविकात माहिती देताना महाविद्यालयाला मागील शैक्षणिक वर्षात “जिल्हास्तरीय उत्कृष्ट महाविद्यालय आणि जिल्हास्तरीय उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी म्हणून प्रा. आनंद बुध्दिकोट यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी प्राचार्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांकडून राष्ट्रीय सेवेची शपथ घेतली. प्रा. श्‍वेता भगत यांनी सूत्रसंचालन केले तर कार्यक्रम अधिकारी प्रा. सचिन देवकाते यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)