राष्ट्रीय सणाच्या दिवशी ग्रामसभा नाही

संग्रहित छायाचित्र

राज्य शासनाचा निर्णय; वर्षांत होणार केवळ चार सभा
पिरंगुट – राष्ट्रीय सणाच्या दिवशी ग्रामसभा न घेण्याची राज्य ग्रामसेवक युनियनने केलेली मागणी शासनाने मान्य केली आहे. आता, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमनातील कलम 7 नुसार मे, ऑगस्ट, नोव्हेंबर या तीन महिन्यात व 26 जानेवारी रोजी अशा चार ग्रामसभांचे आयोजन करण्यात येईल. या व्यतिरीक्त ग्रामसभा घ्यायची असल्यास याचा प्रस्ताव ग्रामविकास विभागाकडे पाठवून परवानगी घ्यावी लागणार आहे. जिल्हा परिषदेलाही ग्रामसभा आयोजित करण्यापूर्वी ग्रामविकास विभागाची मान्यता घ्यावी लागणार आहे.

राज्य शासनाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात नमुद केल्याप्रमाणे दि. 26 जानेवारी वगळता इतर राष्ट्रीय व राज्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या तारखेला नियमित ग्रामसभा आयोजित करण्यात येणार नाही. मात्र, अशा तारखेला ध्वजवंदन, सांस्कृतिक कार्यक्रम, राज्य शासनाचे काही संदेश किंवा प्रबोधन द्यायचे असल्यास, अशा संदेशाचे वाचन व प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. मात्र, असे संदेश ग्रामसभेमार्फत द्यायचे असल्यास संबंधित इतर प्रशासकीय विभागांनी ते ग्रामविकास विभागाकडे पाठवायचे आहेत, त्यानंतर ग्रामविकास विभागाकडून तशा सूचना जिल्हा परिषदेला देण्यात येतील.

राष्ट्रीय सणाच्या दिवशी प्रत्येक भारतीय व्यक्ती आनंद उत्सव साजरा करते. परंतु, याच दिवशी ग्रामसभा असल्याने ऐकमेकांची राजकीय उनी दुनी चुकती करण्याची राजकीय प्रवृत्ती बाळवत होती. यामुळे राष्ट्रीय सणाच्या दिवशी होणाऱ्या ग्रामसभा राजकीय आखाडा झाल्या होत्या तसेच अशा प्रसंगी ग्रामसेवकांच्या जिवावर बेतणाऱ्या घटनाही घडत होत्या. या सर्व प्रकाराने ग्रामसेवकांचे स्वास्थ लोप पावत चालले आहे. यामुळेच राज्य ग्रामसेवक युनियनने ग्रामसेवकांची होणारी कुचंबणा आणि व्यथा शासनाच्या लक्षात आणून देत राष्ट्रीय सणांच्या दिवशी होणाऱ्या ग्रामसभा रद्द करण्यात याव्यात, अशी मागणी लावून धरली होती. याच पार्श्‍वभुमीवर शासनाने निर्णय घेतला आहे. आता, यापुढे ग्रामविकास विभागाच्या पूर्व परवानगी शिवाय कुणालाही ग्रामसभा घेता येणार नाही. राज्य ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष एकनाथ ढाकणे, सरचिटणिस प्रशांत जामोदे, राज्य कोषाध्यक्ष संजीव निकम, प्रसिद्धी प्रमुख बापूसाहेब अहिरे आणि संपूर्ण राज्य पदाधिकारी यांचे राज्यातील सर्व ग्रामसेवक संवर्गातून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे.

राज्य ग्रामसेवक युनियनच्या अभूतपूर्व लढ्यास अखेर यश आले आहे. ग्रामसभा घेण्यावर आचार संहिता लागू झाली आहे. आता यापुढे 26 जानेवारी वगळता इतर राष्ट्रीय सणाच्या दिवशी ग्रामसभा होणार नाहीत.
– चंद्रकांत जगताप, पुणे जिल्हा अध्यक्ष, ग्रामसेवक युनियन


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)