राष्ट्रीय व राज्य महामार्गांवरही आता ई-दंडवसुली!

महामार्ग पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांची माहिती

भोर-पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गांवरही आता ई-दंडवसुली सुरु केली जाणार असल्याची माहिती पुणे विभागाचे महामार्ग पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी दिली आहे. त्यामुळे महामार्गावर सुरू असेलल्या महामार्ग पोलिसांच्या वाटमारीला आळा बसेल, अशी अपेक्षा आहे. वाहतूक नियमाचे उल्लंघन केल्यास वाहनचालकाकडून डिजिटल पद्धतीने दंडवसुली केली जाईल. “एक राज्य एक ई-चलन’ हा प्रकल्प महाराष्ट्रात सुरु झाला आहे. त्याची पुणे सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, जिल्ह्यातील महामार्गावरही अंमलबजावणी केली जाईल, असेही महामार्ग अधीक्षकांनी सांगितले.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. त्यासाठी पावतीद्वारे चलन भरून घेतले जाते. त्यात गैरप्रकार होत असल्याचे निदर्शनास आले आहे. हे प्रकार टाळण्यासाठी राज्यात “एक राज्य एक ई-चलन’ हा प्रकल्प राबविला जात आहे. सध्या या प्रकल्पांतर्गत पुणे-मुंबई एक्‍स्प्रेस वेवर कारवाई केली जात आहे. हा प्रकल्प आता इतर जिल्ह्यांतून जाणाऱ्या महामार्गावरही राबविला जाणार आहे.

मोहिते म्हणाले, डिजीटल चलनामुळे जीईएन पावती पुस्तके वापरण्याची गरज नाही. तसेच, केसेस संदर्भातील रेकॉर्ड ठेवण्याचीही आवश्‍यकता नाही. ई-चलन प्रकल्पामुळे सर्व केसेस अथवा अपघातांची माहिती ऑनलाईन प्राप्त होऊ शकते. त्यामुळे रेकॉर्ड तपासत बसण्याची आवश्‍यकता नाही. कुठे अपघात झाल्यास घटनास्थळाच्या परिस्थितीचा फोटो काढून कंट्रोल रुमला फोटोसह सविस्तर माहिती पाठविता येते. त्यामुळे तातडीने उपाययोजनात्मक हालचाली करता येतात.

 • चोरीची वाहने सापडण्यास मदत
  डिजीटल ई-चलन पद्धतीद्वारे वाहनाची इत्थंभूत माहिती तातडीने व ऑनलाइन मिळत असल्याने व या प्रकल्पाची अंमलबजावणी आता सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यात केली जात असल्याने मोठ्या प्रमाणात चोरीची वाहने सापडू शकतात. गाडीचा रंग, आकार आदीमध्ये काही बदल केले गेलेत का हेही कळेल. कोणत्याही महामार्ग पोलिसाने गाडी अडवून तिची तपासणी सुरु केल्यास ही कारवाई कुठे सुरु आहे, हे ऑनलाईन लगेच कळेल. त्यामुळे किरकोळ कारणावरून वाहने अडवून त्यांची होणारी आर्थिक लूट थांबेल.
 • एखाद्या वाहन चालकाने वाहतूक नियमाचे उल्लंघन केल्यास त्याला दंड ठोठावला जाईल. दंडाची रक्कम रोखीने अथवा डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारेही भरता येईल. रोख रक्कम अथवा कार्डामार्फत भरता येणे त्याला त्याक्षणी शक्‍य नसल्यास ई-चलनात ही रक्कम अनपेड म्हणून दाखवली जाईल. ही थकबाकी भरत नाही तोपर्यंत संबंधित वाहनचालक भविष्यात वाहनाचे कोणतेही व्यवहार करू शकणार नाहीत, तसेच त्याच्यावर पुढील कारवाई करता येईल.
  -मिलिंद मोहिते, पोलीस अधीक्षक महामार्ग
 • हे आहेत ई-चलनाचे फायदे
  महामार्ग पोलिसांच्या अनधिकृत कारवायांना व “वाटमारी’ला आळा बसेल
  चोरीची वाहने शोधण्यास मदत होईल. गाडीचा रंग, आकार व इतर बदल केल्यास लगेच समजणार.
  कारवाईची माहिती संपूर्ण महाराष्ट्रात समजणार
  वाहनाच्या विम्याची माहिती, वाहनाची संपूर्ण माहिती एका क्‍लिकवर कळणार
  यापूर्वीचा दंड, चालकाचे गुन्हे याची माहिती कळणार
  अपघाताचा फोटोसह माहिती कंट्रोल रुमला मिळणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)