राष्ट्रीय वरिष्ठ मैदानी अजिंक्‍यपद स्पर्धा: शर्मिला कुमारी, मुरली कुमार यांना सलामीला सुवर्णपदक 

भुवनेश्‍वर: रेल्वेची शर्मिला कुमारी आणि गुजरातचा मुरली कुमार गावित यांनी आपापल्या क्रीडाप्रकारांत सुवर्णपदकाची कमाई करताना राष्ट्रीय वरिष्ठ मैदानी अजिंक्‍यपद स्पर्धेचा पहिला दिवस गाजविला.
शर्मिला कुमारीने महिलांच्या भालाफेकीत सोनेरी यश मिळविले, तर मुरली कुमार गावितने पुरुषांच्या 10 हजार मीटर शर्यतीत सुवर्णाची कमाई केली. तसेच जपानच्या तीन ऍथलीट्‌सचा सहभाग हे पहिल्या दिवसाचे आकर्षण ठरले. महिलांच्या 400 मीटर. शर्यतीच्या प्राथमिक फेरीत जपानच्या ताकेसिशीने 54.61 सेकंद वेळेसह तिसऱ्या क्रमांकाने अंतिम फेरी गाठली. भारताची कविता (54.48 से.) आणि चार्वी सेहरावत (54.53 से.) यांनी पहिल्या दोन क्रमांकांसह अंतिम फेरीतील स्थान निश्‍चित केले.
त्याआधी शर्मिला कुमारीने 54.81 मीटर फेक करताना महिलांच्या भालाफेकीत सुवर्णपदकाची कमाई केली. शर्मिलाने आशियाई कांस्यपदक विजेत्या राणीला (52.98 मी.) मागे टाकले. शर्मिलाने याआधीची आपली 54.21 मीटर ही सर्वोत्तम कामगिरी सहज मागे टाकली. तर राणीला मात्र 61.86 मीटर या आपल्या सर्वोत्तम कामगिरीच्या जवळपासही जाता आले नाही व त्यामुळे रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. के. रश्‍मीने 50.16 मीटर फेक करताना कांस्यपदकाची निश्‍चिती केली.
पुरुषांच्या 10 हजार मी. शर्यतीत मुरली कुमारने 29 मि. 49.79 सेकंद वेळेसह सुवर्णपदक पटकावले. रेल्वेच्या रणजीत पटेलला (29 मि. 50.43 सेकंद) रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तर सेनादलाच्या प्रदीपने 29 मि. 52.37 सेकंद वेळेत अंतिम रेषा पार करताना कांस्यपदकाची कमाई केली.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)