राष्ट्रीय, मराठा युद्धस्मारकांना ‘हेरिटेज’ दर्जा?

गायत्री वाजपेयी

केंद्रीय समितीला प्रस्ताव : ऐतिहासिक वास्तूंच्या जतन, संवर्धनाचे प्रयत्न

पुणे: भारतीय लष्कराच्या संपन्न अशा इतिहासाची सैर घडविणाऱ्या राष्ट्रीय युद्धस्मारक आणि मराठा रेजिमेंटच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या “मराठा वॉर मेमोरिअल’ला “हेरिटज’ नामांकन मिळविण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. याविषयीचा प्रस्ताव कॅन्टोन्मेंट बोर्डाने पुणे भेटीवर असलेल्या संरक्षण मंत्रालयाच्या केंद्रीय समितीला नुकताच सोपविला आहे. त्यामुळे या वास्तूला “हेरिटेज रॅंकिंग’ (वारसा स्थळ) मिळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

लष्कराच्या पुण्यातील दक्षिण मुख्यालयासह विविध संस्थांच्या स्थापनेसह विविध लढायांचे फोटो, माहिती, पुरातन शस्त्रास्त्रांपासून अत्याधुनिक मशिनगन्स व लॉंचर्सपर्यंतची शस्त्रास्त्रे, विविध रणगाडे, जवानांचा संपूर्ण पोशाख व किट यांच्या माध्यमातून भारतीय लष्कराची शौर्यगाथा सर्वांपर्यंत पोहोचविली जाते. बोर्डाच्या हद्दीत असणाऱ्या काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक वास्तूंचे योग्यप्रकारे जतन, संवर्धन होण्यासाठी या वास्तूंना वारसा स्थळाचा दर्जा मिळावा, असा प्रस्ताव बोर्डाने केंद्रीय समितीला दिला आहे.यामध्ये राष्ट्रीय युद्धस्मारकाचाही समावेश आहे. याबाबत बोर्डाच्या उपाध्यक्षा प्रियंका श्रीगिरी म्हणाल्या, “ब्रिटिश काळापासून लष्करी वसाहत असलेल्या लष्कर परिसरात स्वातंत्र्यापूर्वीच्या अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत.

आजही त्या चांगल्या स्वरूपात असून, त्यातील अनेक वास्तूंना समृद्ध सांस्कृतिक वारसा आहे. इतकेच नव्हे, तर येथील लोकांच्या मनातही या वास्तूंबद्दल आपुलकीचे स्थान आहे. त्यामुळेच या वास्तूंचे योग्यप्रकारे जतन आणि संवर्धन होण्यासाठी यांचा वारसास्थळांत समावेश व्हावा, अशी आमची इच्छा आहे. त्यासाठीच बोर्डाने हा प्रस्ताव पाठविला आहे.’ याबाबत दक्षिण मुख्यालयाशी संपर्क साधला असता, “हा बोर्डाचा स्वतंत्र प्रस्ताव असून, मुख्यालयाला याबाबत काही माहिती नाही,’ असे सांगण्यात आले. मात्र, युद्धस्मारकाला वारसा स्थळ म्हणून घोषित केल्यास आनंदच होईल, असेही मुख्यालय प्रशासनाने म्हटले आहे.

या वास्तूंचा प्रस्तावात समावेश

वारसा स्थळाचा दर्जा मिळावा, यासाठी बोर्डाने युद्धस्मारकासोबतच लष्कर परिसरातील मराठा युद्धस्मारक, शिवाजी मार्केट, सेंट पॅट्रिक चर्च, सेंट मेरी चर्च, रेसकोर्स, शिंदे पॅलेस, मेहेरबाबा दर्गा या वास्तूंच्या नावांचाही समावेश या संबंधित प्रस्तावात केला आहे.

दक्षिण सदर्न कमांडचे महत्त्व  

दक्षिण मुख्यालयाचा इतिहास मांडणारे स्मारक असावे, या संकल्पनेतूनच “नॅशनल वॉर मेमोरिअल’ म्हणजेच राष्ट्रीय युद्धस्मारक उभारण्यात आले आहे. सद्यस्थितीत या स्मारकाची देखरेख पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि दक्षिण मुख्यालय यांच्यातर्फे संयुक्तपणे केली जाते. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाच्या अखत्यारितील क्षेत्र हे भारतातील सर्वांत मोठे क्षेत्र असून, यामध्ये दक्षिणेकडील राज्ये, महाराष्ट्र, राजस्थानसह भारताचा 40 टक्के भूभाग यामध्ये येतो. दक्षिण क्षेत्राचे मुख्यालय सुरुवातीपासूनच पुण्यात आहे. लष्कराच्या विविध मोहिमा, लढायांमध्ये दक्षिण क्षेत्राने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळेच दक्षिण मुख्यालयाला मानाचे स्थान आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
2 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)