राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार विजेता निलेश भिल भावासह बेपत्ता

जळगाव : राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार विजेता निलेश भिल छोट्या भावासह बेपत्ता झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. निलेशची आई सुंदरबाई रेवाराम भिल यांनी 19 मे रोजी मुक्ताईनगर पोलिस स्टेशनमध्ये दोघेही बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आहे. निलेश भिल हा जळगावमधील मुक्ताईनगर तालुक्‍यातील कोथळी गावात राहतो. दोघेही बेपत्ता झाल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, निलेश भिल आणि त्याचा भाऊ गणपत भिल 17 मे रोजी बेपत्ता झाले. निलेश रेवाराम भिल हा 12 वर्षांचा असून त्याचा लहान भाऊ गणपत रेवाराम भिल अवघ्या 7 वर्षाचा आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरिक्षक वंदना सोनुने या करत आहेत. दरम्यान, 30 ऑगस्ट 2014 रोजी मुक्ताई मंदिरासमोर भाविकांसाठी तयार केलेल्या घाटात भागवत घोगले हा मुलगा पाय घसरुन पडला. ही बाब लक्षात येताच मंदिरात आलेल्या निलेशने स्वत:च्या जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी मारली. काही मिनिटातच भागवतला पाण्यातून सुखरुप बाहेर काढून त्याचे प्राण वाचवले. या धाडसाबद्दल निलेशला 26 जानेवारी 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय बालशौर्य पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)