राष्ट्रीय कुमार टेनिस अजिंक्‍यपद स्पर्धेचे आयोजन

पुणे – पुण्यात एकाच वेळी तीन प्रमुख राष्ट्रीय स्तरावरील टेनिस स्पर्धांना येत्या 20 मेपासून सुरुवात होत यामध्ये 12व्या रमेश देसाई मेमोरियल 16 वर्षांखालील राष्ट्रीय कुमार टेनिस स्पर्धा, एचसीएल आशियाई 18 वर्षांखालील कुमार बी 1 आयटीएफ टेनिस स्पर्धा आणि आशियाई एटीएफ टेनिस अजिंक्‍यपद स्पर्धेचा समावेश आहे.

पुणे शहरांत 33 वर्षांच्या कालावधीनंतर राष्ट्रीय कुमार टेनिस अजिंक्‍यपद स्पर्धेचे आयोजन होत असल्याचे एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर यांनी सांगितले. याआधी 1984मध्ये रावळगाव कुमार टेनिस स्पर्धेचे शहरांत आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) आणि पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए) यांच्या संयुक्‍त प्रयत्नांतून एमएसएलटीए स्कूल ऑफ टेनिस, श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी स्पोर्टस कॉम्प्लेक्‍स येथे करण्यात आले आहे.

बाराव्या रमेश देसाई मेमोरियल 16 वर्षांखालील राष्ट्रीय कुमार टेनिस स्पर्धेसाठी मुले व मुलींच्या गटात देशभरांतून 200 हून अधिक खेळाडू आपला सहभाग नोंदवतील अशी आशा आहे. तसेच, पहिल्या फेरीपासूनच तीन लाखांहून अधिक रकमेची शिष्यवृत्ती खेळाडूंना प्रदान करण्यात येणार आहे. यामध्ये 16 वर्षांखालील मुलांच्या गटाचा मुख्य फेरीचा ड्रॉ 64 खेळाडूंचा, तर मुलींच्या गटाचा ड्रॉ 48 खेळाडूंचा असणार असल्याचे अय्यर यांनी नमूद केले.
तसेच, 12 व 16 वर्षांखालील गटातील स्पर्धा एआयटीएचे माजी सहसचिव आणि एमएसएलटीएचे माजी मानद सचिव रमेश देसाई यांच्या स्मरणार्थ दरवर्षी आयोजित करण्यात येते. ही स्पर्धा रमेश देसाई यांच्या सन्मानार्थ भरविण्यात येत असून या स्पर्धेच्या माध्यमातून कुमार पातळीवर टेनिसच्या प्रचारासाठी निश्‍चितच मदत होईल, असे एमएसएलटीएचे अध्यक्ष भरत ओझा यांनी सांगितले.

सोळा वर्षांखालील गटांतील स्पर्धा पुण्यात पहिल्यांदाच होत असून 12 वर्षांखालील गटांतील टेनिस स्पर्धा मुंबई येथे एमएसएलटीए कॉम्प्लेक्‍स येथे होणार आहे. स्पर्धेसाठी आयटीएफ व्हाईट बॅच ऑफिशिअल वैशाली शेकटकर यांची सुपरवायझर म्हणून नियुक्‍ती करण्यात आली आहे. स्पर्धेच्या पात्रता फेरीचे सामने शनिवार, दि. 20 मे आणि रविवार दि. 21 मे रोजी खेळविण्यात येणार असून मुख्य फेरीस सोमवार दि. 22 मे पासून प्रारंभ होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)