राष्ट्रवादी-शिवसेनेच्या वादात भाजपचा महापौर

केडगाव दुहेरी हत्याकांडाचे राष्ट्रवादीने (जगताप गट) काढले उट्टे : शहरात नवीन समीकरणाचा झाला उदय

जयंत कुलकर्णी

नगर – महापालिका निवडणुकीतच राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजप याची छुप्पी युती असल्याचा आरोप शिवसेनेने वारंवार केला होता.आज झालेल्या महापौर – उपमहापौरपदाच्या निवडणुकीत ही अभद्र युती चव्हाट्यावर आली आहे. शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने केलेली खेळी यशस्वी झाली असून भाजपचा महापौर झाला. अर्थात केडगाव येथील दुहेरी हत्याकांडानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांना अनेक आरोपांसह शिवसेनेने आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. त्यातून नेत्यांनी मोठी मानहानी झाली होती. तेव्हापासून शहरात शिवसेना व राष्ट्रवादी असा संघर्ष सुरू झाला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या दोघांचा वाद चांगलाच विकोपला गेला होता.त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेचा महापौर होवू द्यायचा नाही असा चंग बांधलेल्या राष्ट्रवादीने भाजपला ऑफर दिली. दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ या म्हणीप्रमाणे महापालिका निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकाच्या जागा मिळवून आज महापालिकेत भाजपचा झेंडा फडकला आहे.

नगरच्या महापौरपदाच्या निवडणुकीत दरवेळी वेगवेगळी समिकरण जुळविण्यात आली आहे. ती समिकरणे राज्याच्या राजकारणात सर्वच पक्षांसाठी डोकेदुखी तर ठरली आहे. तसेच या नव्या समिकरणांनी इतिहास ठरविली आहे. दोन महापौर देणाऱ्या या महापलिकेमुळे शासनाला व न्यायालयाला देखील काही निर्णय बदलावे लागले आहे. त्यामुळे नगरच्या महापौरपदाच्या निवडणुकीत काहीही होवू शकते. तसे ते आज ठरले देखील.

महापालिकेच्या निवडणुकीत निर्माण झालेल्या त्रिशंकू स्थितीमुळे कोणाचा महापौर होणार याबाबत कमालीची उत्सुकता होती. परंतू अखेरच्या क्षणी शिवसेना व भाजप युती होणार असे वाटत होते. शिवसेनेने घेतलेली ताठर भूमिकेमुळे भाजपने देखील शिवसेनेला चारा घातला नाही. निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकून शिवसेनेने आघाडी घेतली होती. शिवसेनेला 24 जागा मिळाल्या. त्या खालोखाल राष्ट्रवादीला 18 तर तिसऱ्या क्रमांक भाजप गेला होता.

भाजपला 14 जागांवर समाधान मानावे लागले होते. अर्थात भाजपने या निवडणुकीत सर्वच स्तरावर आघाडी घेतली होती. त्यातून 40 प्लसचा नारा भाजपने दिला होता. परंतू 14 वर भाजपला मजल मारता आली. बसपाने चार, दोन अपक्ष तर एक जागा सपाने मिळाली होती. या त्रिशंकू स्थितीतून मार्ग काढणे तसे सोपे होते. शिवसेना व भाजप या दोघांची युती झाली असती तर हा घोडेबाजार होण्याची शक्‍यता टळली असती. परंतू राष्ट्रवादीला शिवसेनेचा महापौर होवू द्यायचा नव्हता. त्या दृष्टीने राष्ट्रवादीने (आ.जगताप गट) भाजपला पाठिंब्याची ऑफर दिली. एकही पद न घेता हा पाठिंबा देण्याची ऑफर भाजपने स्वीकारली. केडगाव प्रकरणामुळे झालेली मानहानी राष्ट्रवादीचे नेते विसरले नव्हते. त्याचे उट्टे काढण्याची ही संधी राष्ट्रवादीकडे होती.

सर्वाधिक जागा मिळूनही शिवसेना सत्तेपासून दूर राहते. ही शिवसेनेच्या दृष्टीने मोठी सल ठरले. त्यामुळे राष्ट्रवादीने पदापेक्षाही शिवसेनेशी जिरावाजिरवेचे राजकारण सुरू केले. अर्थात राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींना ही अभद्र युती मान्य नव्हती. त्यांनी भाजपबरोबर युती न करण्याचा आदेश दिला होता. परंतू तो आदेश देखील नेत्यांनी आज धुडकावून लावला. कारण एकच शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवणे. तसा वाद शिवसेना व भाजपमध्ये होता. परंतू केडगाव प्रकरणामुळे राष्ट्रवादी व शिवसेनाचा वाद रंगला होता. या दोघांच्या भांडणात आज भाजपचा महापौर झाला आहे. खासदार दिलीप गांधी व आमदार संग्राम जगताप यांनी शिवसेनेच्या अनिल राठोड यांना जोरदार धोबीपछाड देवून नगरमध्ये नव्या इतिहास रचला आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राष्ट्रीय व प्रदेशपातळीवरून भाजपबरोबर युती न करण्याचे आदेश देवून त्यांनी स्थानिक राजकारणाला महत्व देत पक्षाला जुमानले नाही. अर्थाने भाजपच्या स्थानिक नेत्यांनी या अभद्र युतीसाठी पुढाकार घेतला असला तरी त्यांना वरिष्ठपातळीवरून देखील तेवढेच पाठबळ मिळाले आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व पालकमंत्री प्रा. राम शिंदे हे आज दोघेही जातीने नगरला हजर होते. हे दोन्ही मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्‍वास मानले जातात. त्यामुळे भाजपने शिवसेना व राष्ट्रवादीच्या वादाचा फायदा घेवून महापालिकेवर अखेर पक्षाचा झेंड फडकविला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)