राष्ट्रवादी नेत्यांच्या भोजनात भाजपच्या साहेबांची “रुची’

अजित पवार यांची नगर तालुक्‍यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या घरी गुफ्तगू

नगर: जिल्हा परिषदेचे सदस्य, शिवसेनेचे पदाधिकारी आणि पांगरमल (ता. नगर) येथील बनावट दारूकांडातील संशयित आरोपी भाग्यश्री मोकाटे यांच्या बायजाबाई जेऊर (ता. नगर) येथील घरी माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी नेते अजित पवार व त्यांच्याबरोबर असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जेवण घेतले. भाग्यश्री मोकाटे यांचे वडील गोविंद मोकाटे यांनी नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचे स्वागत करत त्यांच्याबरोबर स्नेहभोजन घेतले. राष्ट्रवादी नेत्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या घरी घेतलेल्या स्नेहभोजनात भारतीय जनता पक्षाच्या “साहेबांनी’ रुची घेतल्याचे बोलले जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेनेचे संदेश कार्ले, कॉंग्रेसचे बाळासाहेब हराळ उपस्थित होते. पवार, पाटील यांच्याबरोबर या स्थानिक पदाधिकाऱ्यांची रात्री उशिरापर्यंत दोन तास गुप्तगू रंगली होती. या स्नेहभोजनाच्यानिमित्ताने नगर-राहुरी विधानसभा मतदारसंघाबरोबर नगर शहरातील राजकीय समीकरणावर चर्चा झाल्याचे बोलले जात होते. या चर्चेत नेमके काय झाले, याची शहानिशा नगर तालुक्‍यातील “साहेब’ घेत असल्याचेही खात्रीलायक समजते.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राज्यात परिवर्तन निर्धार यात्रा सुरू आहे. नगर लोकसभा मतदार संघात ही यात्रा दोन दिवसांपासून सुरू आहे. यानिमित्ता राष्ट्रवादीचे नेते नगर दौऱ्यावर आहेत. माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, पक्ष निरीक्षक दिलीप वळसे पाटील आदी नगर दौऱ्यावर आहेत. अजित पवार यांची पाथर्डी आणि नगर तालुक्‍यातील बायजाबाई जेऊर येथे शुक्रवारी सभा झाली. बायजाबाई जेऊर येथे रात्री उशिरा सभा होती. या सभेनंतर अजित पवार, जयंत पाटील हे शिवसेनेचे पदाधिकारी गोविंद मोकाटे आणि जिल्हा परिषद सदस्य भाग्यश्री मोकाटे यांच्या घरी स्नेहभोजनाचा आनंद घेतला. राष्ट्रवादीचे हे नेते मोकाटे यांच्या घरी तब्बल दोन तास होते. शिवसेनेचे संदेश कार्ले आणि कॉंग्रेसचे बाळासाहेब हराळ देखील या स्नेहभोजनात सहभागी झाले होते. यानिमित्ताने पवार, पाटील यांच्याबरोबर स्थानिक पदाधिकाऱ्यांची बरीच राजकीय खलबते झाली. मोकाटे यांच्या घरी पवार आणि पाटील यांनी घेतलेले स्नेहभोजन आणि त्याला उपस्थित असलेले शिवसेनेचे व कॉंग्रेसचे पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित झालेली राजकीय खबलते नगर-राहुरी विधानसभा मतदार संघात चर्चेचा विषय ठरली आहेत. या राजकीय नेते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नगर शहरातील राजकीय समीकरणांची देखील बरीच चर्चा झाल्याचे समजते.


आमदार शिवाजी कर्डिले यांच्या विरोधात मोट!

बायजाबाई जेऊर (ता. नगर) येथे झालेल्या सभेला राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे हे देखील उपस्थित होते. अजित पवार यांना नगर-राहुरी विधानसभा मतदार संघावर लक्ष केंद्रीत केले आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्याविरोधात पवार यांनी मोट बांधण्यास सुरूवात केल्याचे बोलले जात आहे. पवार यांना कर्डिले यांचा नगर शहरातील राजकारणातील हस्तक्षेप रुचलेला नाही. शरद पवार यांचा आदेश डावलून शहर राष्ट्रवादीने भारतीय जनता पक्षाबरोबर मनपात एकत्र आली आहे. परिणामी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. या राजकीय समीकरणामागे कर्डिले यांची खेळी आहे. त्यामुळे नगर-राहुरी विधानसभा मतदारसंघात कर्डिले यांच्याविरोधात मोट बांधण्यासाठी पवार यांची स्नेहभोजनाच्या निमित्ताने ही चाचपणी असल्याचे सांगितले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)