मोजक्याच कार्यकर्त्यांमध्ये आटोपती बैठक
नगर: विविध महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी बोलविलेल्या बैठकीला अनेकांनी पाठ फिरवली. आमदार, माजी आमदार तर सोडा पण तालुकाध्यक्षांसह जिल्ह्यातील नेते व कार्यकर्त्यांनी बैठकीला गैहजर रहाणेच पसंत केले आहे. त्यामुळे मोजक्यात कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत फाळके यांना बैठक आटोपती द्यावी लागली. विशेष म्हणजे या बैठकीचे निमित्त करून अनेक नेते शहरात आले होते. पण बैठकीला पक्षाच्या कार्यालयात गेले नाही. त्यामुळे फाळके यांच्या कार्यपद्धतीबाबत जिल्ह्यात नाराजी असल्याचे स्पष्ट होत आहे.
फाळके यांनी आज दुपारी 1 वाजता राष्ट्रवादी भवन या पक्षाच्या कार्यालयात महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. जिल्ह्यातील प्रमुख नेते व कार्यकर्त्यांना बोलविण्यात आले होते. बैठकीत जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा, राष्ट्रवादी कॉंग्रेसची जिल्हा कार्यकारिणी निवडणे, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमांचे नियोजन, महापालिका निवडणूक या विषयावर चर्चा होणार होती. परंतू नेते व कार्यकर्त्यांचा प्रतिसाद पाहिल्यानंतर या सर्वच विषयावर वरवर चर्चा करण्यात आली. दुष्काळी परिस्थितीबाबत झालेल्या आढाव्यात कार्यकर्त्यांनी अनेक मुद्दे मांडले. परंतू जिल्हा परिषद व पंचायत समितीचे पदाधिकारी उपस्थित नसल्याने त्यावर ठोस निर्णय झाला नाही.
जिल्हा कार्यकारिणीबाबत देखील फारशी चर्चा झाली नाही. त्याबाबत नावे पाठविण्याचे सांगण्यात आले. या बैठकीला मोजकेच नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामुळे या बैठकीचा निव्वळ फार्स झाला असल्याची पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे. फाळके यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी संघटना वाढीसाठी प्रयत्न सुरू केले. वेळेप्रसंगी कटूता देखील त्यांनी स्वीकारली आहे. परंतू जिल्ह्यातील नेते व कार्यकर्ते त्यांच्या कार्यपद्धतीबाबत नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे फाळके यांनी बोलविलेल्या बैठकांना नेते व कार्यकर्ते उपस्थित राहत नाही. केवळ पक्षाचे वरिष्ठ नेते आले की जिल्ह्यातील नेते व कार्यकर्त्यांची गर्दी होते. इतरवेळी मात्र नेते व कार्यकर्ते पक्षाच्या कार्यालयात फिरकत देखील नाही. अशी स्थिती आहे. त्यात आता फाळके जिल्हाध्यक्ष झाल्याचे कारण पुढे केले जात आहे. या बैठकीला हजर नसले तरी बहुतांशी नेते व कार्यकर्ते हे नगर शहरात विविध कामानिमित्त आले होते. परंतू त्यापैकी अनेकांनी बैठकीकडे पाठ फिरवली.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा