राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आयुक्‍तांना घेराव

पिंपरी – चिंचवड येथील लैंगिक अत्याचारग्रस्त अल्पवयीन मुलीवर वैद्यकीय उपचार करण्यास वायसीएमच्या डॉक्‍टरांनी असमर्थता दर्शवत उपचाराकरिता ससून रुग्णालयात पाठविले. डॉक्‍टरच्या या असंवदेनशीलतेमुळे नागरिकांच्या संतापात भर पडली आहे. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आक्रमक भुमिका घेत, आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांना घेराव घालत, अशी असंवेदनशील व बेजबाबदार वर्तणूक करणाऱ्या डॉक्‍टरवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली.

चिंचवड येथे मंगळवारी (दि. 2) रात्री एका चार वर्षाच्या मुलीवर एका आरोपीने लैंगिक अत्याचार करुन, तिला जखमी करुन सोडून दिले. अशा अवस्थेत ती घरी आल्यानंतर कुटुंबियांनी विचारल्यानंतर लैंगिक अत्याचाराची धक्कादायक बाब उघडकीस आली. त्यानंतर या मुलीच्या पालकांनी तिला वैद्यकीय उपचारांकरिता तत्काळ वायसीएम रुग्णालयात आणले. परंतु, त्या अत्याचारग्रस्त मुलीवर प्रथमोपचार न करता पुढील उपचार करण्यास उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी असमर्थता दर्शविली. तिला पुढील उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयामध्ये पाठविण्यात आले.

-Ads-

यापूर्वीच कासारसाई येथे दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना ताजी आहे. चिंचवडमध्ये चार वर्षांच्या मुलीवर मंगळवारी रात्री लैंगिक अत्याचाराची घटना घडली. कासारसाईच्या घटनेमुळे शहरातील नागरीकांमध्ये भितीचे व संतापाचे वातावरण आहे. चिंचवडमधील पीडीत चार वर्षांच्या मुलीवर उपचार करुन हे प्रकरण संवेदनशीलपणे हाताळून मुलीच्या नातेवाईकांना दिलासा देऊन, समुपदेशन करणे गरजेचे होते. परंतु, वायसीएममधील सर्वच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हे प्रकरण असंवेदशीलपणे हाताळले. या निंदनीय प्रकाराला जबाबदार असणाऱ्या सर्वच वैद्यकीय अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करावी व दौषी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या सह राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आयुक्त हर्डीकर यांच्याकडे केली आहे. याशिवाय महापालिकेचे अतिरिक्‍त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांना देखील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी घेराव घातला होता.
या घटनेची चौकशी करुन, दोषी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आश्‍वासन आयुक्त हर्डीकर यांनी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना दिले आहे.

दर्जेदार वैद्यकीय सुविधेसाठी महापालिका वायसीएम रुग्णालयावर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र, मंगळवारी या रुग्णालयाच्या डॉक्‍टरांनी अत्याचारग्रस्त मुलीवर उपचार करण्यास असमर्थता दर्शवून, त्यांची समाजाप्रति असलेली असंवेदनशीलता दाखवून दिली आहे. या असंवेदनशीलतेसाठी महापालिका या डॉक्‍टरांना गलेलठ्ठ पगार देत नाही. अशा डॉक्‍टरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आयुक्तांकडे केली आहे.
– दत्ता साने, विरोधी पक्षनेते, पिंपरी-चिंचवड महापालिका.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)