राष्ट्रवादीत पदाधिकारी बदलाचे वारे

भिगवण- राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकारी बदलाचे वारे वाहत असल्याने इंदापूर तालुका अध्यक्ष निवडीसाठी इच्छुकांनी कंबर कसली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने तालुका अध्यक्षपदाचा भाव वाढल्याचे चित्र निर्माण झाले असून वरिष्ठ नेत्यांच्या थेट संपर्कासाठी अनेकांनी फिल्डिंग लावल्याची चर्चा आहे.
इंदापूर तालुक्‍यातील इच्छुकांची मात्र चांगलीच गोची झाली आहे पदासाठी कोणाकडे फिल्डिंग लावायची असा यक्ष प्रश्‍न त्यांच्या पुढे आहे कारण जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर याच तालुक्‍यातील असल्याने सर्वच राजकीय पार्श्‍वभूमी गारटकरांना तोंडपाट आहे. महारुद्र पाटील, दशरथ डोंगरे आणि सचिन सपकळ यांची नावे तालुकाध्यक्ष पदासाठी चर्चेत आहेत. तर महारुद्र पाटील हे पदावर कार्यरत असल्याने पुन्हा संधी मिळणार की नाही हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे, तर सचिन सपकळ तालुका युवकच्या पदावर कार्यरत आहेत मात्र, दशरथ डोंगरे अद्याप कोणत्याही पदावर नसल्याने आणि तालुक्‍यातील जातीय समीकरणाचा विचार करता डोंगरे यांच्याकडे पद जाण्याची शक्‍यता आहे.
महारुद्र पाटील यांनी आपल्या तालुकाध्यक्ष पदाच्या कार्यकाळात चांगली कामगिरी करून दाखवली आहे इंदापूर तालुक्‍यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेसची एकहाती सत्ता होती मात्र, याला सुरुंग लावण्याचे काम महारुद्र पाटील यांच्या काळात झाले. इंदापूर नगरपालिकेत बहुसंख्येने नगरसेवक निवडून आणण्या बरोबरच मार्केट कमिटीवर सत्ता प्रस्तापित केली. खरेदी-विक्री संघावर झेंडा फडकावला. चार जिल्हा परिषद सदस्यांच्यासह पंचायत समितीत काट्याची टक्कर दिली. या कार्यकाळात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांत 27 पैकी 15 ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवली. इंदापूर सहकारी साखर कारखान्यावर झालेल्या आंदोलनात सहभागी होऊन तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची सभा उधळली. पळसदेव, बिजवडी जिल्हा परिषद गटात कॉंग्रेसचे अनेक पदाधिकारी असतानाही गट राखून ठेवला आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हर्षवर्धन पाटील यांच्या 20 वर्षांच्या साम्राज्याला सुरुंग लावण्यात सिंहाचा वाटा असल्याने महारुद्र पाटील तालुकाध्यक्ष पदासाठी पुन्हा इच्छुक आहेत. मात्र, जातीय समीकरणात तालुक्‍यात माळी समाजाला पक्षाने योग्य संधी मिळाली नसल्याने व दशरथ डोंगरे हे प्रदीप गारटकर यांचे शिष्य असल्याने डोंगरे यांना संधी मिळण्याची शक्‍यता आहे तर सचिन सपकळ हे मराठा समाजाचे असल्याने मराठा समाजाला पुरेसे प्रतिनिधीत्व दिल्याने सपकळ यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्‍यता धूसर आहे.

  • वारसाहक्काने पदे मिळवणाऱ्यांची गोची
    इंदापूर, बारामती आणि आंबेगाव या विधानसभा मतदार संघातील तालुकाध्यक्षांना सत्तेची फळे चाखायला मिळण्याची शक्‍यता असल्याने या तालुक्‍यात पदासाठी तीव्र स्पर्धा आहे. तर इतर तालुक्‍यात विधानसभा निवडणुकीत तिकीट वितरणाच्या प्रक्रियेत सहभाग मिळावा यासाठी चढाओढ लागली आहे. पुणे जिल्हा अध्यक्षपदी प्रदीप गारटकर यांची निवड झाल्यानंतर तालुकाध्यक्ष निवडीचे वेध सर्वांनाच लागले आहेत. पदासाठी लॉबिंग खपऊन घेणार नाही, कष्टाळू आणि पूर्ण वेळ देऊ शकणाऱ्या व्यक्‍तीस पदे दिली जातील, असे गारटकर यांनी सांगितले आहे. यामुळे वारसा हक्काने पदे मिळवणारांची चांगलीच गोची झाली आहे. तर जिल्ह्यात निवडी करताना गारटकरांना त्रास होणार नाही, मात्र आपल्याच तालुक्‍यात मात्र मोठी डोकेदुखी होणार आहे यात शंका नाही.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)