राष्ट्रवादीच्या होमपिचवर भाजपची पॅकेज बॅटिंग

मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांची रविवारी साताऱ्यात हजेरी 

सातारा – आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील जनतेची मने व मते वळविण्यासाठी भाजपचा हा प्रयत्न आहे. यानिमित्ताने भाजप जिल्ह्यात शक्तिप्रदर्शन करणार आहे. सध्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे वारे सध्या वाहू लागले आहे. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात कमळ उगविण्याची तयारी भाजपचे नेते करत आहेत. त्यासाठी कऱ्हाड दक्षिण, कऱ्हाड उत्तर, कोरेगाव, माण, फलटण या पाच मतदारसंघात त्यांनी जोर लावला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे साताऱ्यात संपर्क ठेऊन आहेत. यासोबतच लोक सभा निवडणुकीसाठीही राष्ट्रवादीच्या उमेदवाराला टक्कर देणाऱ्या उमेदवाराच्या शोधात भाजपचे नेते आहेत. या सर्व पार्श्‍वभूमीवर राज्य व केंद्रातील रसद ही स्थानिक भाजप नेत्यांना मिळत आहे. पाच राज्यांतील निकालात भाजपची झालेली पीछेहाट ओळखून आता आगामी निवडणुकीत दगाफटका होऊ नये म्हणून भाजपने विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात जिल्हानिहाय निधी दिला आहे. यामध्ये साताऱ्यातील विविध रस्त्यांच्या कामांसाठी दहा हजार कोटींचे “पॅकेज’ दिले आहे.

यामध्ये महामार्गाच्या सहापदरीकरणापासून ते प्रमुख राज्य मार्गांच्या चौपदरीकरणाच्या कामांचा समावेश आहे. या विकासकामांच्या माध्यमातून जनतेच्या मनापर्यंत पोचून त्यांची मते लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मिळविण्यासाठी त्यांचा हा प्रयत्न आहे. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला कोणत्याही परिस्थितीत खिंडार पाडणे हाच या मागचा भाजप नेत्यांचा “अजेंडा’ आहे. त्यासाठी सर्व बाजूने प्रयत्न केले जातील. आता रस्त्यासाठी दिलेल्या या “पॅकेज’च्या माध्यमातून जनतेच्या मनात बसण्याचा प्रयत्न होणार आहे.

जिल्ह्यातील विविध रस्त्यांच्या कामांसाठी केंद्रातील भाजप सरकारने दहा हजार कोटींचा निधी दिला आहे. या पॅकेजच्या निमित्ताने भाजपने तब्बल अर्धा डझन मंत्री व एक केंद्रिय मंत्री यांच्या निमित्ताने सातारकरांना अच्छे दिनाची साद घालत लोकसभा निवडणुकांचा अप्रत्यक्षपणे बिगूल वाजवला आहे. सातारा जिल्ह्याच्या विकासाचे अनेक प्रश्‍न अद्याप प्रलंबित असताना राष्ट्रवादीच्या राजकीय गडकोटांमध्ये विकासाची तुतारी वाजवायला भाजपचे कार्यकर्ते आसुसले आहेत.

तब्बल सहा प्रकल्पांचे एका वेळी भूमिपूजन आणि त्यानिमित्ताने राजकीय समीकरणांची बेरीज यासाठी महसुल मंत्री चंद्रकांतदादा पाटील येत्या दोन दिवसात साताऱ्यात तळ ठोकण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. या कामांचे भूमिपूजन येत्या रविवारी (ता. 23) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. या वेळी मुख्यमंत्र्यांसह पाच ते सहा मंत्री उपस्थित राहणार आहेत.

सैनिक स्कूलच्या मैदानावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यानिमित्ताने जिल्ह्यातील भाजपचे नेते शक्तिप्रदर्शन करणार आहेत. बालेकिल्ल्यात होणाऱ्या या शक्तिप्रदर्शनातून भाजपची वाढलेली ताकद दिसून येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)