राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाला छगन भुजबळ येणार

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार : कार्यकर्त्यांनी स्वत:चा खर्च स्वत: करावा
– वर्धापन दिन आणि हल्लाबोल आंदोलनाचा समारोप पुण्यात
– वाढत्या महागाईकडे भाजप नेत्यांनी लक्ष देण्याचा सल्ला

प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि.22 – राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा वर्धापन दिन आणि हल्लाबोल आंदोलनाचा समारोप या निमित्ताने शहरात भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेला राज्यभरातून हजारो कार्यकर्ते आणि पदाधिकारी येणार आहेत. परंतु, त्यांनी स्वत:ची सोय स्वत: करावी, पक्षाकडून काहीही मिळणार नाही. उलट सभेच्या नियोजनाच्या कामात मदत करावी, असे स्पष्ट शब्दांत माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. तसेच या सभेत ज्येष्ठ नेते छगन भुजबळ बोलणार असल्याची माहिती पवार यांनी दिली. त्यामुळे भुजबळ काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वर्धापन दिन आणि हल्लाबोल आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात बैठक झाली. या बैठकीत सभेच्या नियोजनासह उपस्थित कार्यकर्त्यांची कानउघडणी करत, सत्ताधाऱ्यांचाही खरपूस समाचार घेतला. यावेळी शहर अध्यक्षा व खासदार ऍड. वंदना चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष विश्‍वास देवकाते, जिल्हा अध्यक्ष जालींदर कामठे, महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे, प्रवक्ते अंकुश काकडे, माजी उपमहापौर दीपक मानकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, जिल्हा महिला अध्यक्षा वैशाली नागवडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. येत्या 10 जून रोजी ही सभा होणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे मागील दोन वर्षांपासून अटकेत होते. त्यांची जामिनावर सुटका झाली असून त्यांची मी नुकतीच भेट घेतली. त्यावेळी पुण्यात होणाऱ्या सभेत ते बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अमृता बाबर यांच्या कृतीची दखल घेणार
नगरसेविका अमृता बाबर यांनी महिला बालकल्याण समिती सदस्यपदाचा राजीनामा देत पक्षाच्या कार्यपध्दतीवर नाराजी व्यक्त केली. “याची दखल लवकर न घेतल्यास कठोर पाऊले उचलावी लागतील असे वक्तव्य बाबर यांनी केल्यामुळे पक्षात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या नाराजीचा विषय बैठकीमध्ये निघाल्यावर नगरसेविका बाबर यांच्या बोलण्यामागचे कारण मागून घेतले असून, अशा गोष्टी सभागृहात खपून घेणार नाही. त्यांच्या अन्याय होत असेल, तर त्वरीत दखल घेतली जाईल, असे स्पष्ट मत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केले.

अडीच दिवसांच्या मुख्यमंत्र्यांचे रेकार्ड कोणीही मोडणार नाही
कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पांचे अडीच दिवसांचे मुख्यमंत्री होण्याचे रेकार्ड देशात कोणीही तोडू शकणार नाही, अशी कोपरखळी मारत अजित पवार यांनी भाजपाच्या कार्यपद्धतीचा खरपूस समाचार घेतला. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजप बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याने कॉग्रेस आणि जेडीएसचे आमदार फोडण्यासाठी काही कोटींची ऑफर दिल्याच्या ऑडिओ क्‍लिप समोर आल्या. त्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांनी सारवासारव केली. दरम्यान, केंद्र सरकार देशात जीवनावश्‍यक वस्तूवरील दर स्थिर ठेवण्यात अपयशी ठरली असून, पेट्रोल आणि डिझेलची दरवाढीने उच्चांक गाठला आहे. अशा जीवनावश्‍यक गोष्टींकडे लक्ष देऊन पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन केली पाहिजे, असे आवाहन पवार यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)