राष्ट्रवादीच्या युवक मेळाव्याचा फज्जा

पराभवाचे सावट : गर्दीसाठी पदाधिकारी ताटकळले
पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीतील पराभवाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसवरील सावट अद्यापही सरले नसल्याचे आज (गुरुवारी) झालेल्या राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या मेळाव्यावरुन दिसून आले. युवकांनी दांडी मारल्याने मेळाव्याचा अक्षरशः फज्जा उडाला. गर्दीच्या प्रतिक्षेत दोन तास उशिराने मेळावा सुरु झाला. तोपर्यंत ताटकळण्याची वेळ पदाधिकाऱ्यांवर आली.

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने चिंचवड येथील दर्शन हॉलमध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी नवनिर्वाचित अध्यक्ष संग्राम कोते पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. मेळाव्याला साडेचार वाजता सुरुवात होणार होती. मात्र, संयोजक वगळता पूर्णतः शुकशुकाट दिसून आला. साडेचार वाजल्यापासून सूत्रसंचालक कार्यकर्त्यांना सभागृहात येण्याच्या सूचना करत होते. बाहेर ढोल-ताशे वाजवून वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न झाला तरीही कार्यकर्ते म्हणावे तसे जमले नाहीत.

सभागृहात एकाच बाजूला तुरळक ठिकाणी कार्यकर्ते बसले होते. तर दुसऱ्या बाजूला पुर्ण हॉल रिकामा दिसत होता. सत्ताकाळात गल्लीबोळातील कार्यकर्ते देखील गर्दी करायचे. मात्र, विरोधी पक्षनेते योगेश बहल यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनीही मेळाव्याकडे पाठ फिरवली. युवतींची संख्याही बोटावर मोजण्या इतकीच होती. काही पदाधिकाऱ्यांनी जाहीर भाषणातून याबाबतची सल बोलून दाखवली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी लग्नसराई असल्यामुळे युवकांचा सहभाग कमी असल्याचे सांगत वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केला. माजी आमदार विलास लांडे यांनीही खंत व्यक्‍त केली. या मेळाव्यात युवक शहराध्यक्ष निवड होण्याची शक्‍यता होती. मात्र, गर्दी जमवण्यासाठी ही चर्चा पेरली गेल्याची कुणकुण कार्यकर्त्यांना लागली. त्यामुळे निलेश काटे यांच्यासह अध्यक्षपदाच्या अनेक दावेदारांनी मेळाव्याकडे पाठ फिरवली. “घर फिरले की त्याचे वासेही फिरतात’, याचा प्रत्यय राष्ट्रवादीच्या युवक मेळाव्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)