राष्ट्रवादीच्या युवकांनी सरकारचा निषेध करावा

मंचर-नुसत्याच घोषणा करणारे आणि पूर्ण न करता त्यावर राजकारण करणारे हे सरकार जनतेच्या हिताचे नाही. या सरकारला मोठ्या प्रमाणावर मतदान करून आता जनतेला पश्‍चातापाची वेळ आली आहे. “भीक नको पण कुत्रं आवर’ अशी भावना सर्वसामान्य जनता बोलून दाखवायला लागली आहे. या परिस्थितीत पक्षाच्या युवक कार्यकर्त्यांनी मागे न पडता आक्रमकपणे आंदोलने, मोर्चे काढून सरकारचा निषेध नोंदवायला हवा, असा इशारा पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांनी दिला.
आंबेगाव तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची आढावा बैठक राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मंचर येथे पार पडली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून तालुक्‍यातील सर्व गावात राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या शाखा स्थापन करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
बैठकीला मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर म्हणाले की, तिकडे बारामती लोकसभा मतदार संघात तिथले खासदार सुप्रिया सुळे आठवड्यातून तीन दिवस मतदार संघातील गावागावांत लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी झटत असतात.परंतु आपल्याकडे तीन वर्षे झाली आपले खासदार ना आपल्याला कुठे दिसले ना शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांविषयी दिल्लीत भांडताना दिसले.
जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी देखील मार्गदर्शन करताना सरकारवर टीकेची झोड उठवत युवकांनी सरकारचा बेबंद कारभाराचा बुरखा फाडण्याची गरज बोलून दाखविली. अभ्यास करून बोललं पाहिजे, सोशल मीडियाचा जास्तीत जास्त चांगला वापर करून पक्षाची भूमिका मांडली पाहिजे, असे आवाहन विवेक वळसे पाटील यांनी केले. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस तालुकाध्यक्ष निलेश थोरात, रमेश खिलारी, समिर थोरात, युवराज काळे, सचिन हिंगे यांची भाषणे झाली. राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे अध्यक्ष आदेश गाडे यांनी सूत्रसंचालन केले. तर खरेदी विक्री संघाचे संचालक अनिल वाळुंज यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)