राष्ट्रवादीच्या तीन नगरसेवकांवर गुन्हा

पिंपरी – दापोडी मधील पाणीटंचाई विरोधात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पुणे-मुंबई महामार्गावर दापोडी येथे नागरिकांसह आंदोलन केले. त्यावरून भर रस्त्यात बेकायदेशीर जमाव जमवून परिसरात दहशत पसरविल्याप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तीन नगरसेवकांसह अन्य 25 ते 30 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगरसेवक रोहित काटे, राजू बनसोडे, नगरसेविका स्वाती काटे तसेच मंगेश काटे, संजय उपार, अल्ताफ शेख, पांडुरंग काची, शहीद कुरेशी आणि अन्य 25 ते 30 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून फिर्याद देण्यात आली आहे. दापोडी मधील पाणी पुरवठा मागील दीड वर्षांपासून विस्कळीत आहे. महापालिका प्रशासनाला याबाबत सांगून देखील जाणीवपूर्वक कृत्रिम पाणी टंचाई निर्माण केली जात आहे, असा आरोप करत त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी नागरिकांना सोबत घेऊन पुणे-मुंबई जुना महामार्गावर दापोडी येथे हांडे घेऊन आंदोलन केले. यावरून पोलिसांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तीन नगरसेवकांसह अन्य 25 ते 30 जणांविरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला. भर रस्त्यात बेकायदेशीर जमाव जमवून परिसरात दहशत पसरविल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

विविध नागरी प्रश्‍नावर आंदोलन करणाऱ्या विरोधी पक्षाच्या नगरसेवकांवर प्रशासनाला हाताशी धरुन गुन्हा दाखल करण्याची खेळी सत्ताधारी करत असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रवेशद्वारावर कचरा फेको आंदोलन केल्याप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका पौर्णिमा सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचवेळी महापालिका प्रवेशद्वारासमोर फ्लेक्‍स टाकणारे भाजप नगरसेवक तुषार कामठे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, नगरसेविका सोनवणे यांच्यावर दखलपात्र तर नगरसेवक कामठे यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल झाल्याने भाजपवर दुजाभावाचा आरोप झाला होता. महापालिकेच्या दारात कचरा टाकल्याबद्दल मनसे गटनेत्यांसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर तळवडे, चिखली भागातील पाणी प्रश्‍नी पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना त्यांच्या दालनात कोंडून ठेवल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्यासह राष्ट्रवादीच्या अकरा नगरसेवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या आणखी तीन नगरसेवकांवरही गुन्हा दाखल झाला आहे.

गेल्या दीड वर्षांपासून दापोडीकरांना विस्कळीत पाणी पुरवठा होत आहे. मागील काही महिन्यात ही समस्या तीव्र झाली आहे. याबाबत महापालिका प्रशासनाकडे वारंवार दाद मागूनही त्याची दखल घेतली न गेल्याने आम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ आली. आम्ही जे केले ते नागरिकांसाठी केले. नागरिकांच्या प्रश्‍नावर दाद मागितल्यानंतर आमच्यावर गुन्हे दाखल होत असतील तर आमची काही हरकत नाही. मात्र, सत्ताधाऱ्यांकडून प्रशासनाला हाताशी धरुन विरोधी पक्षाच्या नगरसेवकांवर गुन्हे दाखल करण्याचे उद्योग चुकीचे आहेत.
– राजू बनसोडे, नगरसेवक, राष्ट्रवादी कॉंग्रेस.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)