राष्ट्रवादीचे “मिशन पुणे’

ऐन निवडणुकांच्या तोंडावर 1999 साली स्थापन झालेल्या राष्ट्रवादीने अगदी स्थापनेपासून आपली घोडदौड कायम राखली होती. केंद्र, राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्था येथील सत्ता काबीज करताना राष्ट्रवादीच्या विजयाचा वारू चौफेर उधळला होता. मात्र, 2014 मध्ये आलेल्या मोदी लाटेमुळे राष्ट्रवादीला आपल्या विधानसभेतील सर्व जागा कायम राखता आल्या नाहीत. सिक्‍सर मारण्याच्या आवेशात मैदानात उतरलेल्या खेळाडूला अवघी एक धाव घेऊन तंबूत परतावे लागावे तद्वत राष्ट्रवादीची जोरदार घसरगुंडी झाली. भले त्याला कारणे काही असतो, पण मुत्सद्दी पक्षाध्यक्ष असतानाही त्यांना आपल्या सर्व जागा राखता आल्या नाहीत, हे खरेच! गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत ही सर्व सत्तास्थाने गमावण्याची वेळ राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आली. ती पुन्हा मिळवण्याची धडपड राष्ट्रवादीने सुरू केली आहे. त्यासाठी पुण्यात राष्ट्रवादीला पोषक वातावरणही मिळत आहे.

भाजपची गत निवडणुकीत रणनिती अतिशय अचूक होती. पण, जे चित्र भाजपने मतदारांसमोर उभे केले, ते चित्र सत्यात उतरेल या नागरिकांच्या स्वप्नाचा मात्र भंग झाला. त्यात पुन्हा देशाच्या लोकशाहीला सुरुंग लावणाऱ्या काही घटना घडल्या. उदा. गुन्हे अन्वेषण विभागांतर्गतच्या घटना असतील, राफेल भ्रष्टाचार, वाढती महागाई, यासारख्या गोष्टींमुळे देशात गोंधळाची परिस्थिती निर्माण होत आहे. या पार्श्‍वभूमीवर आता राष्ट्रवादीच्या मुत्सद्दी नेतृत्वाने एकीकडे कॉंग्रेसला “चुचकारत राजकारणाची सगळी सूत्रे हाती घेतली नाहीत तरच नवल! याची सुरुवात फार पूर्वीच झाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुण्यात जे घडते त्याचे पडसाद राज्यात नव्हे तर देशभर उमटतात. याची प्रचिती राष्ट्रवादीच्या नेत्यांना यापूर्वीही आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सत्ताकाबीजसाठी आंदोलन आणि पर्यायाने सरकारच्या निषेधाचा शुभारंभ आणि सांगता पुण्यातच करण्याला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे असोत किंवा अजित पवार यांनी पुण्यातील कार्यकर्ता गेल्या दोन वर्षांमध्ये हलवून जागा केला आहे. पुण्यात घडणाऱ्या छोट्या-छोट्या घटनेवर देखील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तुटून पडत आहेत. अधिकाऱ्यांना काळे फासणे असो किंवा पोलीस चौकी फोडणे असो, प्रत्येक ठिकाणी राष्ट्रवादीच्या वरपासून शेवटच्या फळीपर्यंत काम करणारे कार्यकर्ते रस्त्यावर येऊन आंदोलने, मोर्चे करत आहेत. पूर्वी भडक आक्रमकता हा शब्द केवळ शिवसेनेची मक्तेदारी होता, पण आता त्याहीपेक्षा जास्त आक्रमकतेने राष्ट्रवादी कॉंग्रेस समोर येत आहे.

पुण्यामध्ये एखादी चळवळ उभी राहिली की, ती अल्पावधीत देशव्यापी होते, याचे अचूक भान आणि ज्ञान राष्ट्रवादीकडे आहे. याचा परिणाम बेटी बचाओपासून संविधान बचाओ पर्यंतच्या सर्व चळवळी राष्ट्रवादीने पुण्यातून यशस्वीपणे सुरू केल्या. पुण्यातील भाजपच्या 100 नगरसेवकांनाही आपसातील दुफळीमुळे जे साध्य करता आले नाही, ते एकीचे बळ वापरून राष्ट्रवादीने सत्ता नसतानाही साध्य केले. म्हणूनच येत्या निवडणुकीत पुण्याच्या जागेवर आपला हक्क सांगण्याचे धाडस ते करू शकले. कॉंग्रेसला चेहराच उरला नसल्याने या सगळ्या परिस्थितीचा फायदा राष्ट्रवादीने उचलायला सुरुवात केली आहे. कॉंग्रेसमध्ये अजूनही सत्ता काबीज करण्याचे प्रयत्न केले जाताना दिसत नाहीत. तसेच आंदोलन करतानाही त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची फळी नाही, नेत्यांची उपस्थिती औपचारिकच असते, राज्यातील आणि केंद्रातील मंत्र्यांनीही आता पुण्याकडे पाठ फिरवली आहे. एखादी घटना घडली तर सत्ताधाऱ्यांविरोधात त्याच दिवशी आंदोलन करण्याची “आयडिया’ही कोणाच्या डोक्‍यात येत नाही आणि आलीच तर त्याची अंमलबजावणीही केली जात नाही.

राष्ट्रवादीने मात्र प्रत्येक गोष्टीत आंदोलन, मोर्चे या माध्यमातून सरकारचा निषेध व्यक्त केला आहे. हल्लाबोल, संविधान मोर्चा, पक्षाचे अधिवेशन, पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम, राज्याचे प्रशिक्षण शिबिर अशा अनेक गोष्टी राष्ट्रवादीने पुण्यात घेतल्या आहेत. याशिवाय आणखी कार्यक्रमही त्यांनी पुण्यात नियोजित केले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादीने जमीन कसायला सुरुवात केली असून, सरकारविरोधातील विषयांवर त्यांची जोरदार आंदोलनेही सुरू आहेत.

बहुतांश जागांवर सत्ता काबीज करण्याचे स्वप्न
पुणे हे कायमच राजकारण आणि सत्ताकारणासाठी चर्चेत राहिले आहे. कॉंग्रेसचे वर्चस्व घालवून राष्ट्रवादीने महापालिकेत सत्ता काबीज केली, परंतु केंद्र, राज्याबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उलथापालथ होऊन पक्षाला मोठी चपराक बसली. हा पराभव पक्षाने मान्य केला परंतु सद्यस्थितीत सत्ताधारी पक्षात कुरघोडीचे राजकारण असल्याने त्याचा फायदा घेत सत्तेच्या बाहेर राहून राष्ट्रवादीने खेळी करत सत्ताधाऱ्यांचे अनेक विषय उलथवून टाकण्याला सुरुवात केली. 24 तास पाणी पुरवठ्याची निविदा, कात्रज-कोंढवा रस्ता, पार्किंग, स्मार्ट सिटी, नव्या विस्तारित वास्तूची गळती, एलईडी दिवे, कर्जरोखे असे अनेक विषय राष्ट्रवादीच्या गळाला लागले. चौफेर टीका झाल्याने अखेर सत्ताधारी भाजपला या विषयात एक पाऊल मागे यावे लागले.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठीही जास्त जागा मागण्याची खेळी या माध्यमातून राष्ट्रवादीने खेळायला सुरुवात केली आहे. या आधीही खासदारकीची जागा आमचीच असा दावा राष्ट्रवादीने केला आहे. त्यातून कॉंग्रेसकडे खासदारकीसाठी चेहरा नसल्याने राष्ट्रवादीला जागा मिळण्याबाबत जास्त आत्मविश्‍वास आहे. विधानसभेतही आठ जागांपैकी बहुतांश जागांवर सत्ता काबीज करण्याचे स्वप्न राष्ट्रवादीने बाळगले असून, त्यादृष्टीनेच विधानसभा मतदार संघातही कार्यक्रमांचे नियोजन पक्षातर्फे करण्यात आले आहे. त्यांच्या या प्रयत्नांना कितपत यश येते हे येणारा काळच ठरवणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)