राष्ट्रवादीची लोकसभेसाठी आज मुंबईत बैठक: खुलेआम होणार चर्चा

साताऱ्याचा निकाल बाराच्या आत लागणार
सातारा – लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी राष्ट्रवादीने एक पाऊल पुढे टाकले असून राज्यातील 25 जागांचे उमेदवार निश्‍चित करण्याच्या दृष्टीने मुंबईत बैठकांना शनिवारपासून सुरूवात झाली आहे. रविवारी सकाळी साडेआकरा वाजता सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून प्रथमच खुलेआम चर्चा केली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरद पवार, प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांच्यासह पक्षश्रेष्ठींच्या उपस्थितीत शनिवारपासून राज्यातील लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निश्‍चिती करण्यासाठी बैठकीस सुरूवात झाली. बैठकीत संबधित मतदारसंघातील आमदारांसह स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रमुख प्रतिनिधींना आमंत्रित करून त्यांची मते जाणून घेण्यात आली.

रविवारी सातारा जिल्ह्यातील सातारा व माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांबाबत मते जाणून घेवून चर्चा करण्यात येणार आहे. राज्यात राष्ट्रवादीच्या वाट्याला असलेल्या जागांपैकी सध्या केवळ सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून गदारोळ सुरू आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादीअंतर्गत आमदारांचा विद्यमान खासदार उदयनराजे यांच्या नावाला विरोध असल्याचे आजपर्यंत सांगण्यात येत होते.

मात्र, खुद्द खा.शरद पवार यांनी खा.उदयनराजे यांच्या नावाला कोणाचा ही विरोध नसल्याचे यापुर्वी स्पष्ट केले होते. या पार्श्‍वभूमीवर रविवारी सकाळी साडेआकरा वाजता सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबत आमदार व स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी हे खा.शरद पवार यांच्यासह उपस्थित प्रदेशाध्यक्ष व इतर नेत्यांसमोर खुलेपणाने आपली मते व्यक्त करणार असल्याने या बैठकीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. साताऱ्यानंतर माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबत चर्चा होणार असून या दोन्ही मतदारसंघाबाबत नेमकी कोणी काय मते व्यक्त केली हे दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)