राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अन्‌ भाजपाचे शक्‍तीप्रदर्शन?

राम नवमीचे निमित्त : विरोधी पक्षनेते बहल यांना आव्हान

पिंपरी – महापालिकेतील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे विरोधी पक्षनेते आणि माजी महापौर योगेश बहल यांच्या बालेकिल्ल्यात भाजपाने शक्‍तीप्रदर्शन केले आहे. राम नवमीच्या निमित्ताने भाजपाचे शहरातील सर्वांत मोठी शोभा यात्रा संत तुकारामनगर येथून काढली. त्यामुळे बहल यांच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठीच शोभा यात्रेचे आयोजन केले होते? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

पिंपरी-चिंचवड शहर म्हणजे एकेकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र, आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे जोडीने या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला. महापालिकेत “कमळ’ फुलवले. संपूर्ण शहरातील बहुतेक प्रभागांत राष्ट्रवादीची पिछेहाट झाली. पण, राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी प्रभाग क्रमांक 20 मध्ये वर्चस्व राखले होते. नगरसेविका सुजाता पालांडे वगळता राष्ट्रवादीचे श्‍याम लांडे आणि सुलक्षणा शिलवंत-धर यांना महापालिका निवडणुकीत विजय मिळवला आहे. विशाल थिएटर परिसर, एच.ए. कॉलनी, महेशनगर, संत तुकारामनगर, महात्मा फुलेनगर, वल्लभनगर, लांडेवाडी झोपडपट्टी, सी.आय.आर.टी., पार्श्वनाथ सोसायटी, कासारवाडी भाग, अग्रसेन नगर, कुंदननगर भाग या प्रभागात येतो. विशेष म्हणजे, संत तुकारामनगर, वल्लभनगर आदी भागातून गेल्या तीस वर्षांपासून तब्बल 6 वेळा महापालिकेवर निवडून आले आहेत.

राष्ट्रवादीच्या पूर्वाश्रमीच्या महिला शहराध्यक्षा सुजाता पालांडे यांनी निवडणुकीच्या काळात तिकीटाच्या वादातून पक्षाला सोडचिठ्ठी दिली. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या विश्‍वासातील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पालांडे यांनी भाजपाच्या तिकीटावर महापालिका निवडणूक लढवली. या निवडणुकीत पालांडे अल्पमतात निवडून आल्या. पण, आमदार महेश लांडगे यांचे विश्‍वासू सहकारी कुणाल लांडगे यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

महापालिका निवडणुकीत या प्रभागात “राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा’ अशी “कॉंटे की टक्‍कर’ पहायला मिळाली. पण, भाजपाला तीन जागा गमवाव्या लागल्या होत्या. आमदार जगताप आणि लांडगे यांच्या शहरातील वर्चस्वाच्या दृष्टीने विरोधी पक्ष नेते योगेश बहल यांची प्रभागातच “राजकीय कोंडी’ करणे अपरिहार्य आहे. त्यामुळे भाजपा नेत्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांना “बळ’ देण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे राम नवमीचा उत्सव कुणालदादा स्पोर्टस फाउंडेशनच्या पुढाकाराने घेतला असला, तरी महापौर नितीन काळजे, खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, सभागृह नेते एकनाथ पवार भाजपाचे नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांनी या शोभा यात्रेला आवर्जुन हजेरी लावली. त्यामुळे भाजपाच्या नेत्यांनी बहल यांना शह देत कुणाल लांडगे यांना राजकीय “प्रमोट’ केले. तसेच, बहल यांचे कट्टर प्रतिस्पर्धी सुजाता पालांडे आणि यशवंत भोसले यांनाही “राजकीय ताकद’ दिली जात आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

शोभा यात्रेला तुफान प्रतिसाद…
पिंपरी-चिंचवडमधील सर्वात मोठा राम नवमी उत्सव संत तुकारामनगर येथे झाला. त्यासाठी हिंदू गर्जना प्रतिष्ठान व रामराज्य प्रतिष्ठानच्या सहकार्याने कुणालदादा स्पोर्टस फाउंडेशनने जय्यत तयारी केली होती. पिंपरी येथील संत तुकारामनगरमध्ये डॉ. डी. वाय. पाटील कॉलेजपासून शोभायात्रा निघाली. या शोभायात्रेमध्ये अग्रभागी तुतारी वादक, सनई चौघड्यांचा निनाद, त्यानंतर 11 घोडे, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांची वेशभूषा केलेले कलावंत घोड्यावर स्वार दिसत होते. त्यानंतर पंजाबी भांगडा नृत्य, मावळ ढोल-ताशा पथक, “नाद भैरव’ पथकाने शोभा यात्रेची रंगत वाढवली. विशेष म्हणजे, शोभा यात्रेसाठी दिमाखदार “राम रथ’ तयार करण्यात आला आहे. त्यावर सात फूट उंच श्री राम यांची मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनारुढ पुतळाही या सेटवर ठेवला होता. तसेच, आकर्षक विद्युत रोषणाई आणि साउंड सिस्टममुळे शोभा यात्रेला तुफान गर्दी झाली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)