राष्ट्रवादीकडून शेतकऱ्यांची दिशाभूल

आमदार बाबुराव पाचर्णे यांचा पलटवार : गळतीचे पाप आघाडी सरकारचे

शिरूर- पुणे जिल्ह्यातील कुठल्याही धरणातील पिण्याचे पाणी सोडून सिंचनासाठी देण्याचे नियोजन नसल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पाण्यासाठीचे आंदोलन व पाणी सोडण्याची मागणी अवास्तव आहे. त्यांच्याकडून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप शिरुर- हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे यांनी पत्रकार परिषदेत केला.

आमदार पाचर्णे म्हणाले की, राज्यात दुष्काळ व पाणीटंचाईची समस्या असताना मतदारसंघात पाण्याची परिस्थिती चांगली आहे. जिल्ह्यातील डिंभा, घोड, भामा आसखेड, चासकमान, खडकवासला धरणातून कालवा समितीने ठरविल्याप्रमाणे पाणी दिले आहे. प्रामुख्याने भामाआसखेड धरणावर लाभक्षेत्र आतापर्यंत नाही. त्यामुळे तीन आवर्तने सोडून भीमा नदीत पाणी सोडण्यात आले आहे. शिरूर तालुक्‍यातील सादलगाव, वडगावरासाई, नागरगाव, रांजणगाव सांडस गावांपर्यंत मुंढवा जॅकवेलचे पाणी सोडल्यामुळे त्या गावांची परिस्थिती चांगली आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या सहकार्यातून मुळा नदीतून पाणी मांडवगण, गणेगाव व बाभुळसर गावांपर्यंत आणण्यासाठी प्रयत्न केला. परंतु दौंड व शिरुर तालुक्‍यातील नागरिकांकडून पाणी उपसा झाल्याने गणेगावपर्यंत पाणी पोहचू शकले नाही. त्यामुळे ही तीन गावे वगळता इतर गावांना या पाण्याचा फायदा झाल्याचे सांगून माजी आमदार अशोक पवार हे स्वतः कालवा सल्लागार समितीवर सदस्य असल्याने त्यांना याबाबत सर्व माहिती आहे. मांडवगण फराटा येथील बंधाऱ्यावर आंदोलन करून राष्ट्रवादीचे माजी आमदार अशोक पवार यांनी राजकारण केल्याचा आरोप आमदार पाचर्णे यांनी यावेळी केला.

चासकमान धरणाची गळती मोठी असल्याने उपलब्ध पाणीसाठा सिंचनासाठी वापरला जात नाही. गळतीचे पाप आघाडी शासनाचे असून त्यासाठी त्यांनी एक रुपयाही खर्च केला नाही. यावर्षीपासून शासनाने पश्‍चिम महाराष्ट्रातील धरण कालव्यासाठी 3973 कोटी रुपयांची सुधारित मान्यता दिली. त्यामध्ये चासकमान व डिंभा धरणाची कालवा दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहे. यापुढील काळात पूर्ण क्षमतेने या धरणातील पाण्याचा वापर होणार आहे. शिरुर शहरातील पिण्यासाठी पाणीसाठा बंधाऱ्यात साडेचार प्लेट असून पारनेर व शिरूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी शेतीचा उपसा थांबविल्यास बंधाऱ्यातील पाणी शिरुर शहराला दोन महिने पुरेल इतका पाणीसाठा शिरूर येथील बंधाऱ्यात उपलब्ध असल्याची माहिती पाचर्णे यांनी दिली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)