राष्ट्रपुरुषांच्या बदनामीची मोहीम सुरू – डॉ. चौधरी

– फुले-शाहू-आंबेडकर-लोकमान्य व्याख्यानमाला

चिंचवड – बौद्धिक उंची कमी असल्याने पुतळ्यांची उंची वाढवली जात आहे. देशात सातत्याने राष्ट्रपुरुषांच्या बदनामीची मोहीम सुरू आहे. परंतु, पंतप्रधान मोदी परदेशात मात्र गांधी आणि इतर राष्ट्रपुरुषांचा उदो उदो करतात, याचे कारण स्वातंत्र्य चळवळीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एकही नेता सामील नसल्याने त्यांना गांधी-आंबेडकर-पटेल यांचे नाव घ्यावे लागते; आणि हेच सत्ताधाऱ्यांचे खरे दुःख आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत आणि पर्यावरण तज्ज्ञ डॉ. विश्वंभर चौधरी यांनी चिंचवड येथे केले.

मोहननगर येथील दत्त मंदिर चौकात जयभवानी तरुण मंडळ आणि कालीमाता मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाच दिवसीय फुले-शाहू-आंबेडकर-लोकमान्य व्याख्यानमालेत याचसाठी केला होता अट्टाहास? ( स्वातंत्र्य चळवळ आणि आजचा भारत) या विषयावरील चतुर्थ पुष्प गुंफताना डॉ. विश्वंभर चौधरी बोलत होते. अध्यक्षस्थानी राजाभाऊ गोलांडे होते. नगरसेविका मीनल यादव, मनीषा महाजन, सुप्रिया सोळांकुरे, छाया देसले, मुख्य संयोजक मारुती भापकरसुभाष पागळे, जालिंदर काळभोर, शंकर काळभोर, गणेश दातीर-पाटील आदी उपस्थित होते.

डॉ. विश्वंभर चौधरी म्हणाले की, देशात यापूर्वी कधी नव्हती एवढी धार्मिक भावना उफाळून आलेली आहे. सोशल मीडियामधून मोदींशिवाय देशाला पर्याय नाही, अशी हाकाटी सुरू आहे. द्वेषभावना वाढीस नेऊन देशाला पुढे जाऊ द्यायचे नाही, असेच सत्ताधाऱ्यांचे धोरण आहे. खरं म्हणजे प्रत्येक देशाला संस्कृती आणि परंपरा असते त्यामुळे त्याचे अवडंबर माजवण्याची गरज नाही. वास्तविक जगात एकही धर्म आणि जात शुद्ध नाही तर सर्वच संकरित असून हे वैज्ञानिक सत्य आहे; पण आताच्या सरकारला धर्म, परंपरा पाहिजे, मात्र वैज्ञानिक दृष्टिकोन नको आहे.

सरदार वल्लभभाई पटेल यांचे महात्मा गांधी आणि पंडित नेहरू यांच्याशी तीव्र मतभेद होते, त्यांना भारताचे पंतप्रधान होऊ दिले नाही असे अनेक गैरसमज मुद्दाम पसरवले जातात. विदेशात शिक्षण घेतले असल्याने नेहरू हे स्त्रीदाक्षिण्य पाळत असत; परंतु आता त्या गोष्टींवरून त्यांचे चारित्र्यहनन केले जाते आहे. यापूर्वीच्या सरकारने टेकड्या आणि भूखंड विकले; तर आताचे सरकार नद्या आणि समुद्र विकायला निघाले आहे. त्यामुळे गांधी, नेहरू, पटेल, सुभाषबाबू, आंबेडकर यांचे स्वातंत्र्यासाठीचे योगदान लक्षात घेऊन त्यांची बदनामी सहन न करता गांधी आणि आंबेडकर यांच्या विचारांचा समन्वय ही काळाची गरज असल्याचे विश्‍वंभर चौधरी यांनी सांगितले.

अनिल जाधव, राहुल साळुंखे, कैलास केसवड, गोरख देवकाते, अभिजित भापकर यांनी संयोजनात सहकार्य केले. अभिजित शेंडगे यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र घावटे यांनी आभार मानले.

सुभाषबाबूंविषयी खोटी माहिती प्रसूत
सुभाषचंद्र बोस यांच्या विषयी देखील आताचे सरकार खोटी माहिती प्रसूत करत असल्याचा आरोप विश्‍वंभर चौधरी यांनी यावेळी केला. सुभाषबाबू यांना कायम पंडित नेहरूंनी साथ दिली. त्यांच्यात आणि गांधीजींमध्ये मतभेद होते; तसेच सरदार पटेल आणि सुभाषबाबू यांचे एकमेकांशी पटत नव्हते याचे कारण सुभाषबाबू कम्युनिस्ट विचारसरणीचे होते. हिटलर आणि मुसोलिनी यांची मदत स्वातंत्र्य चळवळीसाठी घ्यावी, असे सुभाषबाबूंना वाटायचे; पण हुकूमशहांच्या मदतीने स्वातंत्र्य मिळविण्याची कल्पना गांधी आणि कॉंग्रेसला पसंत नव्हती. कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक सुभाषबाबूंनी जिंकली; पण मतभेदामुळे त्यांनी राजीनामा दिला होता, असे असले तरी सुभाषबाबूंना गांधी विषयी व्यक्तिगत आदर होता, असेही विश्‍वंभर चौधरी यांनी नमूद केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)