राष्ट्रपती निवडणुकीच्या शर्यतीत सुशीलकुमार शिंदे, मीरा कुमारांची नावे चर्चेत

नवी दिल्ली : एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा देण्यास कॉंग्रेस पक्षाने नकार दिला आहे. त्यामुळे राष्ट्रपती निवडणुकीच्या शर्यतीत यूपीए आपला उमेदवार देणार असल्याचे आता निश्‍चित झाले आहे. दरम्यान, याविषयीची माहिती कॉंग्रेसच्या वरिष्ठ सूत्रांकडूनही देण्यात आली आहे.
यूपीएकडून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि माजी लोकसभा अध्यक्ष मीना कुमार यांची नाव सध्या चर्चेत आहेत. रामनाथ कोविंद दलित असल्याने विरोधी पक्षांकडेही आता राष्ट्रपतीपदासाठी दलित उमेदवार देणेच भाग असणार आहे. रामनाथ कोविंद एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार आहेत, अशी घोषणा भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी केली. रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपतीपदासाठी पाठिंबा देण्याची विनंती मोदी सरकारने कॉंग्रेसला केली होती. परंतु भाजप-एनडीएने विरोधी पक्षांना विश्वासात न घेता कोविंद यांच्या नावाची घोषणा केल्यामुळे, आता कॉंग्रेसही राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात स्वत:चा उमेदवार देण्याच्या तयारीत आहे.
22 जुलै रोजी राजधानी दिल्लीत दुपारी चार वाजता होणाऱ्या विरोध पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीत राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराच्या नावावर चर्चा होणार असून, उमेदवाराचं नावही निश्‍चित होण्याची शक्‍यता आहे. राष्ट्रपती निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली आहे. आतापर्यंत 15 उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख 28 जून आहे. तर 1 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. यानंतर 17 जुलै रोजी मतदान होईल आणि 20 जुलै रोजी राष्ट्रपतींची घोषणा होईल. सध्याचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपणार आहे. तर नवनिर्वाचित राष्ट्रपती 25 जुलै रोजी पदभार स्वीकारतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)