राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीची मतदान प्रक्रिया पूर्ण

20 रोजी निकालाची घोषणा ः विरोधकांमध्ये फाटाफूट, रामनाथ कोविंद यांचे पारडे जड

नवी दिल्ली – देशातील नवीन राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीसाठीची मतदान प्रक्रिया आज (सोमवारी) पूर्ण झाली आहे. संसदेसह सर्व विधानसभेत मुख्यमंत्री, आमदार आणि संसदीय सदस्यांनी मतदान केले. राष्ट्रपतपदासाठी एनडीएचे रामनाथ कोविंद आणि यूपीएच्या मीराकुमार यांच्या लढत असून एनडीएचे पारडे जड मानले जात आहे.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत तब्बल 14 विरोधी पक्षांना एकत्र आणून रामनाथ कोविंद यांना टक्कर देण्याचा कॉंग्रेसचा प्रयत्न फुटीमुळे निष्प्रभ ठरण्याची चिन्हे आहेत. कारण प्रत्यक्ष मतदानावेळी उत्तर प्रदेश, त्रिपुरा आणि महाराष्ट्रातील अनेक आमदार, खासदारांनी एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना मतदान केले. 20 जुलै रोजी राष्ट्रपतीपदाचा निकाल जाहीर होईल. सध्याचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपणार आहे. तर नवनिर्वाचित राष्ट्रपती 25 जुलै रोजी पदभार स्वीकारतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी संसदेतील मतदान केंद्रात मतदान केले. याशिवाय भाजपाचे वरिष्ठ नेता मुरली मनोहर जोशींसह अन्य केंद्रीयमंत्री आणि संसदीय सदस्यांनीही मतदान केले. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही मतदान प्रक्रियेत भाग घेतला. तसेच उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही मतदानाचा हक्‍क बजाविला. राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीसाठी एकूण 32 मतदान केंद्रात मतदान करण्यात आले.

त्रिपुरातील तृणमूल कॉंग्रेसच्या गटानेही ममतांचा आदेश डावलून थेट कोविंद यांच्या बाजूने मतदान केले. तर महाराष्ट्रात तुरुंगाची हवा खाणारे राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांनीही कोविंद यांना मतदान केले.
776 खासदार आणि 4 हजार 120 आमदारांच्या एकूण मतांचे मूल्य 10 लाख 98 हजार 882 इतके आहे. विजयासाठी कोविंद यांना फक्त 5 लाख 49 हजार 442 मत गरजेची आहेत. त्यामुळे आता विक्रमी मतदानासह कोविंद जिंकतात का हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

महाराष्ट्रातही मतदानाचा उत्साह
महाराष्ट्रातही राष्ट्रपतीपदासाठी मतदानाचा उत्साह पाहायला मिळाला. आज विधीमंडळात 288 पैकी तब्बल 287 आमदारांनी आपला हक्क बजावला. तर बहुजन विकास आघाडीचे क्षितिज ठाकूर परदेशात असल्याने ते मतदान करु शकले नाहीत. या निवडणुकीत भ्रष्टाचाराच्या आरोपात आर्थर रोड जेलमध्ये असलेल्या राष्ट्रवादीच्या छगन भुजबळ आणि रमेश कदम या दोघांनीही मतदान केले. त्यांना कोर्टाने 1 तासाची खास मुभा दिली होती.

रामनाथ कोविंद यांचा विजय निश्‍चित
एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांचा 60 टक्के मतांनी विजय निश्‍चित मानला जात आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोविंद हे विविध राज्यातून मिळालेल्या मतदानाच्या जोरावर प्रणब मुखर्जी यांच्यापेक्षा अधिक मतांनी विजयी होऊ शकतात. 2012मध्ये झालेल्या निवडणूकीत प्रणब यांनी 69 ट्‌क्‍के मते मिळवित प्रतिस्पर्धी पी. ए. संगमा यांना पराभूत केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)