राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधकांमध्ये मतभेद

नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान पूर्ण झाले असून 14 विरोधी पक्षांना एकत्र आणणाऱ्या काँग्रेस डाव विरोधकांच्या मतभेदामुळे उधळला असल्याचे दिसत आहे. रामनाथ कोविंद यांना टक्कर देण्यासाठी काँग्रेसने भरपूर प्रयत्न केले होते. दरम्यान, प्रत्यक्ष मतदानावेळी उत्तर प्रदेश, त्रिपुरा आणि महाराष्ट्रातील अनेक आमदार, खासदारांनी एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना मतदान केल्याचे सांगण्यात येत आहे.
राष्ट्रपतीपदासाठी एनडीएचे रामनाथ कोविंद आणि यूपीएच्या मीरा कुमार यांच्यात लढत असून, एनडीएचे पारडे जड आहे. 20 जुलै रोजी राष्ट्रपतीपदाचा निकाल जाहीर होणार आहे. सध्याचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपणार आहे. तर नवनिर्वाचित राष्ट्रपती 25 जुलै रोजी पदभार स्वीकारतील.
उत्तर प्रदेशातील सपाचे नेते आणि अखिलेश यादव यांचे विरोधक शिवपाल यादव यांच्या गटाचा समावेश आहे. त्रिपुरातील तृणमूल काँग्रेसच्या गटानेही ममतांचा आदेश डावलून थेट कोविंद यांच्या बाजूने आपले मतदान केले आहे. तर महाराष्ट्रात तुरुंगाची हवा खाणारे राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांनीही कोविंद यांना मतदान केले.
776 खासदार आणि 4 हजार 120 आमदारांच्या एकूण मतांचे मूल्य 10 लाख 98 हजार 882 इतकं आहे आणि विजयासाठी कोविंद यांना फक्त 5 लाख 49 हजार 442 मतांची गरज आहे. त्यामुळे आता विक्रमी मतदानासह कोविंद जिंकतात का हे पाहनणे गरजेचे आहे.
महाराष्ट्रातही राष्ट्रपतीपदासाठी मतदानाचा उत्साह पाहायला मिळाला. आज विधीमंडळात 288 पैकी तब्बल 287 आमदारांनी आपला हक्क बजावला. तर बहुजन विकास आघाडीचे क्षितिज ठाकूर परदेशात असल्यानं ते मतदान करु शकले नाहीत.
आजच्या ऐतिहासिक निवडणुकीत भ्रष्टाचाराच्या आरोपात आर्थर रोड जेलमध्ये असलेल्या राष्ट्रवादीच्या छगन भुजबळ आणि रमेश कदम या दोघांनीही मतदान केले. त्यांना न्यायालयाने 1 तासाची खास मुभा दिली होती. प्रकृती अस्वास्थ्यामुळे भुजबळ यांना अँब्युलन्समधून विधीमंडळ परिसरात आणण्यात आले. यावेळी त्यांना चालतानाही त्रास होत असल्याचे स्पष्ट दिसत होते. तर रमेश कदम यांना पोलिसांच्या गाडीतून मतदानासाठी आणण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)