राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी सुमारे 99 टक्के मतदान

मतमोजणी 20 जुलैला

नवी दिल्ली -राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी आज सुमारे 99 टक्के मतदान झाले. सत्तारूढ एनडीचे उमेदवार रामनाथ कोविंद आणि विरोधकांच्या उमेदवार मीराकुमार यांच्यापैकी देशाचे 14 वे राष्ट्रपती कोण ठरणार याचा फैसला 20 जुलैच्या मतमोजणीने होईल.

या निवडणुकीसाठी मतदान करण्याचा अधिकार राज्यसभा, लोकसभेचे खासदार आणि देशातील सर्व विधानसभांच्या आमदारांना होता. राज्यसभा आणि लोकसभेच्या एकूण 776 खासदारांपैकी 771 खासदार मतदानासाठी पात्र ठरले. देशाची राजधानी दिल्लीत 717 खासदार मतदान करणार होते. मात्र, त्यापैकी 714 खासदारांनी त्यांचा हक्क बजावला. तृणमूल कॉंग्रेसचे तपस पाल, बिजदचे रामचंद्र हंसदक आणि पीएमकेचे अंबुमणी रामदास या खासदारांनी मतदान केले नाही. तर इतर खासदारांनी संबंधित राज्यांच्या राजधान्यांमध्ये मतदान करण्याची परवानगी घेतली. त्यात प्रामुख्याने गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय मंत्री उमा भारती यांचा समावेश होता.

दिल्लीत सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदान केले. गुजरातचे आमदार असणारे भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनीही दिल्लीत मतदान करण्याची परवानगी घेतली होती. अरूणाचल प्रदेश, आसाम, गुजरात, छत्तिसगढ, बिहार, हरियाणश, हिमाचल प्रदेश, झारखंड, नागालॅंड, उत्तराखंड आणि पुद्दुचेरीत 100 टक्के मतदान झाले. देशभरातील 4 हजार 120 आमदार मतदानासाठी पात्र ठरले. प्रत्येक खासदाराच्या मताचे मूल्य 708 इतके आहे. तर आमदाराच्या मताचे मूल्य संबंधित राज्याच्या लोकसंख्येच्या आधारे ठरते. त्यानुसार सिक्कीममधील आमदाराच्या मताचे मूल्य सर्वांत कमी 7 तर उत्तरप्रदेशातील आमदाराच्या मताचे मूल्य सर्वांधिक 208 इतके आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)