राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी आकडे कोविंद यांना अनुकूल

एनडीएमध्ये नसणाऱ्या चार पक्षांच्या पाठिंब्यामुळे स्थिती मजबूत
नवी दिल्ली, दि.20 – केंद्रातील सत्तारूढ राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीतील उमेदवार रामनाथ कोविंद यांना आकडे अनुकूल असल्याचे चित्र आहे. एनडीएचे घटक नसणाऱ्या चार पक्षांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे कोविंद यांची स्थिती मजबूत झाली आहे.
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी मतदान करण्याचा अधिकार लोकसभा, राज्यसभेचे सदस्य असणारे खासदार आणि देशातील विधानसभांचे सदस्य असणाऱ्या आमदारांना आहे. प्रत्येक खासदाराच्या मताचे मूल्य 708 इतके आहे. तर प्रत्येक आमदाराच्या मताचे मूल्य संबंधित राज्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणावर अवलंबून आहे. या निवडणुकीतील मतांचे एकूण प्रमाण 10 लाख 98 हजार 903 इतके आहे. विजयी उमेदवाराला निम्म्यापेक्षा अधिक म्हणजे 5 लाख 49 हजार 452 मते मिळणे आवश्‍यक आहे.
भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएकडे हक्काची 5 लाख 37 हजार 683 मते आहेत. त्यात शिवसेनेच्या मतांचाही समावेश आहे. मात्र, शिवसेनेने विरोधात मतदान करण्याचा निर्णय घेतल्यास एनडीएची मतसंख्या 5 लाख 11 हजार 790 पर्यंत खाली येते. अशा स्थितीतही बिजद, अण्णाद्रमुकचा एक गट, तेलंगण राष्ट्र समिती आणि वायएसआर कॉंग्रेस या बाहेरील पक्षांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे एनडीएच्या मतांचे प्रमाण तब्बल 8 लाख 83 हजार 578 पर्यंत पोहचते. प्रत्यक्ष निवडणुकीत एवढी मते मिळाल्यास कोविंद यांचा घवघवीत विजय निश्‍चित होईल. मागील निवडणुकीत कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएचे उमेदवार आणि विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी 3 लाख 97 हजार 776 मताधिक्‍याने विजय मिळवला. त्यांना तब्बल 7 लाख 13 हजार 763 मते मिळाली. तर विरोधी उमेदवार पी.ए.संगमा यांना 3 लाख 15 हजार 987 मतांवर समाधान मानावे लागले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)