राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीबाबत शिवसेनेची भूमिका गुलदस्त्यात

उद्धव ठाकरे घेणार पक्षाच्या नेत्यांची बैठक

मुंबई, दि.19 -केंद्रातील सत्तारूढ आघाडीमधील (एनडीए) भाजपनंतरचा दुसरा मोठा पक्ष असणाऱ्या शिवसेनेने राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीबाबतची भूमिका गुलदस्त्यातच ठेवली आहे. या निवडणुकीतील भूमिका निश्‍चित करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लवकरच पक्षाच्या नेत्यांची बैठक घेणार आहेत. दरम्यान, हिंदुत्ववादी चेहरा न दिल्याने हा पक्ष नाराज असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून भाजपने आज बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा केली. एनडीएचा घटक नसणारे काही पक्ष तातडीने कोविंद यांना पाठिंबा जाहीर करण्यास पुढे सरसावले. मात्र, भाजपचा सर्वांत जुना मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेनेने कोविंद यांना पाठिंबा देण्याविषयी काही बोलण्याचे टाळले. या घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले, भाजप संसदीय मंडळाच्या बैठकीत कोविंद यांचे नाव निश्‍चित झाल्यानंतर त्या पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी उद्धव यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यांनी कोविंद यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले. शिवसेना नेत्यांच्या बैठकीत निर्णय घेऊन तो एक ते दोन दिवसांत कळवू असे उद्धव यांनी त्यांना सांगितल्याची पुस्तीही राऊत यांनी जोडली.

शिवसेनेने सर्वप्रथम एनडीएचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नावाचा आग्रह धरला. मात्र, राष्ट्रपतिपदाची धुरा सांभाळण्याविषयी स्वत: भागवत यांनी अनुत्सुकता दर्शवली. त्यानंतर शिवसेनेकडून दिग्गज कृषिशास्त्रज्ञ एम.एस.स्वामीनाथन यांचे नाव पुढे करण्यात आले. आता भाजपने वेगळेच नाव पुढे केल्याने शिवसेना वेगळी भूमिका घेणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे. शिवसेनेने राष्ट्रपतिपदाच्या मागील दोन निवडणुकांत भाजपचा पाठिंबा असणाऱ्या उमेदवाराच्या मागे उभे राहण्याचे टाळले होते. तसेच यावेळीही घडणार काय, ते लवकरच समजेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)