राशीनच्या 13 कोटींच्या योजनेस मान्यता

मंत्रालयात बैठक; 15 दिवसांत सर्व प्रस्ताव सादर करण्याचे आदेश
नगर – राशीन ग्रामपंचायतीसाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत 12 कोटी 94 लाख रुपये खर्चाच्या नवीन पाणीपुरवठा योजनेस आज पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी तत्वतः मान्यता दिली. या योजनेची तांत्रिक मान्यता व इतर कार्यवाही येत्या पंधरा दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश मंत्र्यांनी दिले. या योजनेमुळे राशीनकरांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी या योजनेचा पाठपुरावा केला.
प्रा. शिंदे यांच्या सुचनेनुसार लोणीकर यांनी आज बैठक आयोजित केली होती. या वेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव पी. वेलरासू यांच्यासह पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अधिकारी, राशीनचे उपसरपंच साहेबराव साळवे, राजेंद्र देशमुख, ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील मोढळे, भीमराव साळवे, संतोष देवगावकर, विशाल देशमुख, राजेंद्र सावताडे, राहुल राऊत आदी या वेळी उपस्थित होते. राशीन पाणीपुरवठा योजनेत राशीन गावठाणासह 13 वस्त्यांचा समावेश आहे. 2035 ची लोकसंख्या गृहीत धरून उजनी धरणातून पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. त्यासाठी 0.67 दलघमी इतके पाणी आरक्षित करण्यात येणार आहे.
लोणीकर यांनी राशीन पाणीपुरवठा योजनेस मान्यता देतानाच यासंबंधीचे प्रशासकीय व तांत्रिक मान्यतेचे प्रस्ताव 15 दिवसांत सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच ही योजना तातडीने सुरू करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यास सांगितले. प्रा. शिंदे म्हणाले, की कर्जत-राशीन प्रादेशिक पाणीपुरवठा योजना निकामी झाल्यामुळे बंद पडली आहे. त्यामुळे दरवर्षी राशीनमध्ये पाणीटंचाई जाणवते. त्यासाठी राशीन पाणीपुरवठा योजना ही राशीनकरांसाठी महत्त्वाची असून ती तातडीने सुरू होणे आवश्‍यक आहे. या योजनेसाठी सौरऊर्जेचा वापर करता येईल, का याचा विचार करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.

What is your reaction?
5 :thumbsup:
2 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
1 :blush:
2 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)