रावणगावात माकडांसाठी राखीव धान्याचा साठा

रावणगाव- रावणगाव (ता. दौंड) येथील ग्रामस्थांनी दुष्काळी स्थिती ओळखून माकडांसाठी धान्याचा राखीव साठा करण्याच्या उद्देशाने शनिवारी (दि. 23) शिरसाई देवी यात्रा कमिटीकडे गहू स्वाधीन केले आहेत. हा उपक्रम येथील मारुती गावडे, दत्तू रांधवण आणि सोपान आटोळे यांनी राबवला आहे.

रावणगाव येथील पंचक्रोशीत माकडांचे अस्तित्व प्रसिद्ध आहे. मुख्य गावठाणातच त्यांचे बहुतांशी वास्तव्य असते. उन्हाळ्याची चाहूल लागताच त्यांच्या खाद्याचा प्रश्‍न निर्माण होत असतो, त्यामुळे पूर्वीपासूनच रावणगाव ग्रामस्थ हंगामानुसार गहू, ज्वारी, बाजरी, मका, हरभरा आदी पिकांची मळणी झाल्यानंतर त्यातील धान्याचा काही हिस्सा माकडांसाठी काढून ठेवतात.

यंदा दुष्काळाचे सावट तीव्र आहे आणि त्यामुळे माकडांच्या खाद्याचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच बिकट बनत चालला आहे. त्या दृष्टीने विचार करूनच हा राखीव धान्यसाठा यात्रा कमिटीकडे देण्यात आला आहे. यावेळी रावणगावचे ज्येष्ठ नागरिक कल्याण आटोळे, दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य भगवान आटोळ, कैलास आटोळे, बापू गावडे, कुशाबा आटोळे, सखाराम भोपाळ, दत्तात्रय नाळे, सोनबा आटोळे, भाऊसाहेब आटोळे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)