राम, शाम आणि राधेशामची कमाई

दीर्घकालीन आर्थिक उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी योग्य म्युच्युअल फंड योजनेची निवड आपल्या आर्थिक सल्लागाराच्या सल्ल्‌याने केल्यास नियोजित वेळेत अपेक्षित असणारी रक्कम उभी करणे सहजशक्‍य होते. आज आपण यासंदर्भातील तीन मित्रांची प्रत्यक्ष घडलेली गोष्ट वाचणार आहोत.

राम, शाम व राधेशाम अशा तीन मित्रांनी एकत्रित दीर्घकालीन गुंतवणूक करण्याचे ठरवले व यासाठी नेमके काय करावे, पैसे कसे व कुठे गुंतवावेत याचे मार्गदर्शन घेण्याचेही ठरवले. आर्थिक सल्लागार श्री. जय यांनी या तीन मित्रांना काही प्रश्न विचारले त्यामध्ये त्यांच्याकडे असणारा गुंतवणुकीचा कालावधी, गुंतवणुकीचे उद्दीष्ट, गुंतवणुकीसाठी जोखिम स्वीकारण्याची तयारी इत्यादी महत्त्वाच्या बाबी समजून घेतल्या.

यानंतर रामच्या एकूण गरजांप्रमाणे व गुंतवणुकीसाठी असणाऱ्या कालावधीनुसार गुंतवणूक करण्याचा निर्णय रामने घेतला. रामकडे रु. दहा लाख गुंतवणुकीसाठी उपलब्ध झाले होते. 2007 मध्ये रामने साधारणतः दहा ते 15 वर्षांच्या कालावधीसाठी आपल्या मुलांच्या उच्च शिक्षणाच्या उद्दीष्टाने गुंतवणुकीचा पर्याय शोधण्यास सुरवात केली. श्री.जय यांच्या मार्गदर्शनामुळे सदर रक्कम जास्तीत जास्त वृद्धीसाठी भांडवली बाजारातील योग्य ती जोखिम घेऊन तज्ञ म्युच्युअल फंड मॅनेजरकडे देण्याचे ठरले. या काळात रामला कोणत्याही परताव्याची आवश्‍यकता नसल्याने त्यांनी संपूर्ण रक्कम वृद्धी (ग्रोथ) पर्यायाची निवड करण्याचे ठरवले.

आर्थिक सल्लागार जय यांनी राम यांना सदर दहा लाख रुपयांची रक्कम म्युच्युअल फंडाच्या मल्टीकॅप फंडामध्ये गुंतवण्याचा सल्ला दिला. या सल्लानुसार रामने इन्व्हेस्को इंडिया कॉन्ट्रॉ फंड – वृद्धी या योजनेची गुंतवणुकीसाठी निवड केली. या योजनेमध्ये पुढील 10 ते 15 वर्षे गुंतवणूक केल्यास राम यांची उद्दीष्टे निश्‍चित पूर्ण होतील असा सल्ला श्री. जय यांनी दिला. या गुंतवणुकीत आता नेमकी किती वाढ झाली आहे हे आपण पाहू.

राम यांनी रु. दहा लाख 2007 मध्ये गुंतवल्यावर त्याचे आज मे 2018 मध्ये रु. 45,85,000 रुपांतर झाले. साधारण वार्षिक व्याज 14.68 टक्के (चक्रवाढ पद्धतीने) दराने सदर गुंतवणूक दहा वर्षात 4.5 पट वाढली.
राम यांनी ही गुंतवणूक 2007 मध्ये सुरु केली ती आता 2018 या कालावधीमध्ये गुंतवणुकीमधून कोणतीही रक्कम काढून न घेतल्याने गुंतवलेल्या सर्व रकमेवर वृद्धी झाली व वाढलेली संपूर्ण रक्कम करमुक्त निर्माण झाली.
श्री. शाम यांनीही श्री. जय यांचा सल्ला घेऊन गुंतवणूक करण्याचे ठरवले.

शामकडेही रु. दहा लाख गुंतवणुकीसाठी उपलब्ध होते. त्यांचेही दीर्घकालीन उद्दीष्ट असल्याने म्युच्युअल फंडात गुंतवणुकीची तयारी दर्शवली. परंतु या काळात काही पैशांची गरज लागण्याची शक्‍यता असल्याने त्यांनी गुंतवणुकीच्या पर्यायामधील लाभांश (डिव्हिडंड) हा पर्याय निवडण्याचे ठरवले. शाम यांनीही रामप्रमाणेच इन्व्हेस्को इंडिया कॉन्ट्रा फंडाची गुंतवणुकीसाठी निवड केली. 2007 साली रु. 10,00,000 लाभांश पर्यायामध्ये गुंतवले. पुढील दहा वर्षामध्ये सहा वेळा या योजनेत लाभांशही घेतला. या काळात शाम यांना मिळालेला एकूण लाभांश 13,70,000 रुपये एवढा होता आणि आज 2018 अखेर लाभांश घेतल्यानंतर रु. दहा लाखांच्या गुंतवणुकीची आजचे मूल्य रु. 24,81,000 आहे.

शाम यांच्या दहा वर्षातील आवश्‍यक असणाऱ्या खर्चांसाठी रू. 13,70,000 वापरण्यास मिळाले व गुंतवलेले दहा लाख रु. वाढून 24,81,00 झाले. या पर्यायात देखील म्युच्युअल फंडाच्या योजनेत शाम यांचे दीर्घकालीन उद्दीष्ट पूर्ण झाले. श्री. राधेशाम यांनीही श्री. जय यांचा सल्ला घेतला होता व आपल्याकडे उपलब्ध असलेली 10,00,000 रुपयांची रक्कम दीर्घकालीन उद्दीष्टासाठी जय यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे इन्व्हेस्को इंडिया कॉट्रा फंडामध्ये गुंतवली. राधेशाम यांना या गुंतवणुकीतून मासिक उत्पन्न मिळण्याची गरज होती. ही बाब त्यांनी श्री. जय यांना सांगितली. एसडब्लूपी (सिस्टिमॅटिक विथड्रॉल प्लॅन) याचा वापर करून दरमहा रु. 6,700 एवढी रक्कम घेण्यास सुरवात केली.

आज 2018 पर्यंत श्री. राधेशाम यांना दरमहा रु. 6,700 मिळत असताना एकूण 8,91,100 रु. परत मिळाले आहेत. परंतु याच काळात गुंतवलेल्या दहा लाखांचे मूल्य रू. 22,26,945 एवढे झाले आहे.
अशा रितीने श्री. राम यांनी दीर्घकालीन उद्दीष्टांसाठी केलेल्या गुंतवणुकीचे रुपांतर रू. 45,85,000 एवढ्या रकमेत झाले. श्री. शाम यांची गुंतवणूक याच काळात रु. 24,81,000 एवढ्या रकमेत रुपांतरीत झाली. याखेरीज त्यांना लाभांशापोटी 13,70,000 रुपये मिळाले. श्री. राधेशाम यांना एवढ्याच गुंतवणुकीत रू. 22,26,945 व मासिक उत्पन्नाच्या रुपाने रु. 8,91,100 मिळाले.

या तीनही उदाहरणातून असे लक्षात येते की, जर गुंतवणूकदाराने गुंतवणुकीसाठी योग्य पर्यायाची निवड केल्यास भविष्यात मिळणारा परतावा आकर्षक व मोठा मिळतो. म्युच्युअल फंडातील अनेक योजनांनी अशा स्वरुपाची परतफेड गुंतवणूकदारांच्या पदरात टाकली आहे. म्हणूनच गुंतवणुकासाठी म्युच्युअल फंड सही है हे ब्रीदवाक्‍य सार्थ ठरते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)