“राम-लक्ष्मण’ जोडीचा महा”ड्रामा’

राजकीय चाणक्‍य निती : स्वपक्षीयांसह विरोधकही बुचकळ्यात

अधिक दिवे

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे “डिसिझन मेकर’ शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप आणि सहयोगी सदस्य आमदार महेश लांडगे यांच्यामध्ये कसलाही गट-तट नसून, सत्तेचा “सारीपाठ’ आगामी किमान दहा वर्षे ताब्यात ठेवण्यासाठी महापौर निवडीपासून ते स्थायी समिती निवडीपर्यंत अत्यंत चाणाक्षपणे केलेला महा”ड्रामा’ आहे. त्यात हे दोन्ही नेते यशस्वी झाले असून, त्यामुळे स्वपक्षासह विरोधकही बुचकळ्यात पडले आहेत.

महापालिका निवडणुकीपूर्वी “नको बारामती…नको भानामती…पिंपरी-चिंचवडची सत्ता देवू राम-लक्ष्मणाच्या हाती’ असा प्रचार जाणीवपूर्वक करुन आमदार जगताप आणि लांडगे यांनी स्थानिक नागरिकांच्या भावनेलाच हात घातला. त्यामुळे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा “बालेकिल्ला पीसीएमसी’ अक्षरश: उद्‌ध्वस्त झाला. सत्ता परिवर्तनानंतर महापालिकेतील कारभार दोन्ही नेत्यांनी वाटून घेतला. जुना पुणे-मुंबई महामार्गाच्या उत्तरेकडील भाग आमदार जगताप यांच्या अधिपत्याखाली आणि दक्षिणेकडील भाग आमदार लांडगे यांच्या वर्चस्वाखाली आला. त्यानुसार महापालिकेतील पदांचे वाटप करण्यात आले. मात्र, निवडणुका झाल्यानंतर लगेचच स्थायी समिती सभापती आणि महापौर निवडीदरम्यान आमदार जगताप, लांडगे आणि निष्ठावान भाजप अशी गटबाजी पहायला मिळाली.

यातून आमदार जगताप समर्थक सीमा सावळे यांना पहिली स्थायी आणि आमदार लांडगे समर्थक नितीन काळजे यांना महापौरपद दिले. मात्र, निष्ठावान नगरसेवकांना डावलले असा, गाजावाजाही झाला. वास्तविक, जगताप आणि लांडगे हे दोन्ही नेते पवारांच्या तालमीत तयार झाले आहेत. पवारांना आव्हान द्यायचे असल्यास दोघांमध्ये एकी असल्याशिवाय पर्याय नाही, हे त्यांना माहीत आहे. त्यातच आगामी दहा वर्षे महापालिका पर्यायायाने शहराची सत्ता आपल्या ताब्यात ठेवायची असेल, तर पद वाटपात ज्या चुका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्या. त्या कदापि करायच्या नाहीत, असा निश्‍चिय दोन्ही नेत्यांनी केलेला दिसतो.

सत्तेच्या पहिल्या वर्षी दोन्ही नेत्यांमध्ये सकारात्मक समन्वय ठेवून महापालिकेचा गाडा हाकण्यात तत्कालीन स्थायी समिती सभापती सीमा सावळे यशस्वी झाल्या. पहिल्या वर्षांतच सुमारे साडेतीन हजार कोटी रुपयांच्या विविध विकास कामांना त्यांनी मंजुरी दिली. विशेष म्हणजे, स्थायी समिती अध्यक्षपद आमदार जगताप यांच्या समर्थक सावळे यांच्याकडे होते; तरीही सर्वाधिक विकासकामे आमदार लांडगे यांच्या भोसरी विधानसभा मतदार संघात झाली आहेत.

मावळते महापौर नितीन काळजे आणि तत्कालीन स्थायी समिती सभापती सीमा सावळे यांच्यात किरकोळ खडाजंगी झाली. विद्यमान सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार आणि सावळे यांच्यात अनेकदा वाद झाला. तरीही आमदार जगताप यांनी फारसे लक्ष घातले नाही. वाकड येथील उद्‌घाटनाच्या कार्यक्रमावरुन आमदार जगताप आणि काळजे यांच्यात कुरबूर झाली, त्यातही आमदार लांडगे यांनी लक्ष घातले नाही. याचा अर्थ महापालिकेतील पदाधिकाऱ्यांमध्ये होणारा लुटूपुटीचा वाद हा “पेल्यातील वादळ’ होते. वास्तविक, दोन्ही आमदारांमध्ये सकारात्मक समन्वय असून, आपल्याला हवे त्याच व्यक्‍तीला महत्त्वाच्या पदावर संधी दिली जात असल्याचे आजवरच्या घडामोडींवरुन पहायला मिळत आहे.

स्थायीसाठी “ना’ राजीनामा नाट्य
सत्ता काळातील दुसऱ्या वर्षात स्थायी समितीवर कोणाला संधी द्यायची, यावर मोर्चेबांधणी झाली. त्यावेळी आमदार लांडगे समर्थक नगरसेवक राहुल जाधव स्पर्धेत होते. तसेच, आमदार जगताप यांचे समर्थक शत्रुघ्न काटे, शितल शिंदे यांची नावे चर्चेत होती. मात्र, ऐनवेळी दोन्ही नेत्यांनी सर्व राजकीय अंदाज धुळीस मिळवत ममता गायकवाड यांना स्थायी समितीपदी संधी देण्यात आली. त्यावेळी आमदार लांडगे समर्थकांनी सोशल मीडियावर जोरदार टीका केली होती. विशेष म्हणजे, आमदार लांडगे यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल केल्याचेही बोलले जाते. त्यावेळी विरोधी पक्ष राष्ट्रवादीने स्थायीची निवडूक लढवली होती. आमदार लांडगे गटातील नाराज, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या स्थायी समितीची गोळाबेरीज करुन स्थायी समिती सभापती राष्ट्रवादीचाच करायचा, असा निश्‍चय सर्वपक्षीय विरोधकांनी केला. मात्र, निवडणुकीत आमदार जगताप आणि लांडगे यांचा “किल्ला अभेद्य’ राहिला. त्यामुळे दोन्ही नेत्यांच्या समर्थकांनी त्यावेळी “ना’राजीनामाची घेतलेली भूमिका ही राजकीय “खेळी’ होती, असाच अर्थ लावला जात आहे.

महापौर निवडही “पेल्यातील वादळ
नुकत्याच झालेल्या महापौर पदाच्या उमेदवारी आणि निवडीबाबतही दोन्ही गटात रस्सीखेच होतेय, असे वातावरण निर्माण करण्यात आले. भोसरीतील एका गटाने माळी समाजाचा आवाज बुलंद केला. तर दुसरीकडे लेवा पाटीदार समाजानेही यावेळी आमच्या समाजातील नगरसेवकाला संधी मिळालीच पाहिजे, अन्यथा भाजपला परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला होता. विशेष म्हणजे, चिंचवडमधील 30-32 नगरसेवकांचा एक गट थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून आला. त्यामुळे भाजपमध्ये पुन्हा आमदार जगताप, आमदार लांडगे आणि निष्ठावान असे गट असल्याबाबत चर्चेला उधाण आले. महापौरपदाच्या निवडीत नगरसेवक शत्रुघ्न काटे, नामदेव ढाके यांची नावे शेवटपर्यंत आघाडीवर असताना आमदार लांडगे समर्थक राहुल जाधव यांना उमेदवारी देण्यात आली. वास्तविक, दोन-तीन दिवसांपूर्वीच महापौरपदाच्या उमेदवाराचे नाव निश्‍चित करण्यात आले होते. पण, पक्षातील संभाव्य विरोध कमी व्हावा, यासाठी अत्यंत नियोजनबद्ध निर्णय घेण्यात आले. विशेष म्हणजे, महापौरपदाचा उमेदवारी अर्ज भरताना आमदार जगताप यांनी महापालिकेतील उपस्थितीही टाळली. तसेच, महापौरपदासाठी एकदा घोषणा झाल्यानंतर प्रबळ दावेदार असलेल्या कुणीही चुळबूळ केली नाही. त्यामुळे महापालिकेतील सर्व रुसवे-फुगवे हे त्या-त्या वेळेपुरते होते. असेच चित्र दिसत आहे.

…ही तर दोन्ही नेत्यांची अपरिहार्यता
वास्तविक, “एक फुल चार-चार माली’ अशी स्थिती महापालिकेतील पद वाटपावरुन झाली आहे. एका पदासाठी अनेक इच्छुक पुढे येत असतात. यावर रामबाण तोडगा म्हणून पाच वर्षांत सर्व नगरसेवकांना विविध पदांवर संधी देण्याचा समझोता झाला आहे. त्यानुसार कुणाला आता, तर कुणाला आगामी काळात संधी देणार, असे आश्‍वासन आमदार जगताप आणि लांडगे देत आहेत. दुसरीकडे, दोन्ही नेत्यांना विधानसभा निवडणुकीची गणिते जुळवायची आहेत. त्यामुळे विधानसभेतील संभाव्य प्रतिस्पर्धी ओळखून त्यांचा बंदोबस्त करण्याच्या दृष्टीने दोन्ही नेत्यांनी पद वाटपाबाबत काळजी घेतलेली दिसते. राजकीय पटलावर पवारांच्या तालमीत तयार झालेले हे दोन्ही नेते वाऱ्याची दिशा ओळखणारे आहेत. त्यामुळेच आगामी निवडणुका आणि संभाव्य प्रतिस्पर्धी यांचा अभ्यास करुन निर्णय घेतले जात आहेत. अजित पवारांच्या सत्ता काळातील सैन्यात बंडाळी माजू द्यायची नसेल तर काळजी घेतलीच पाहिजे. तसेच, एकत्र संसार करायचा म्हटल्यास भांड्याला भांडे लागणारचं म्हणून काय घटस्फोट घ्यायचा का? असा विचार पक्‍का असून, दोन्ही नेत्यांची ही अपरिहार्यता आहे. त्यामुळे तू मारल्या सारखे कर, मी रडल्यासारखे करतो, असे राजकीय महानाट्य तयार झाले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)