राम रहिमला आज शिक्षा सुनावणार

कायदा सुव्यवस्था राखण्यालाच प्राधान्य

पंचकुला आणि सिरसामध्ये अजूनही संचारबंदी

सिरसातील मुख्यालयाबाहेर निमलष्करी दलाचे कडे

चंदिगढ – बलात्काराच्या आरोपामध्ये दोषी आढळलेल्या डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहिम यांना आज शिक्षा सुनावली जाणार आहे. त्यामुळे पंजाब आणि हरियाणामध्ये हिंसाचार उसळण्याची शक्‍यता आहे. मात्र कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यालाच पोलिसांचे प्राधान्य असेल, असे हरियाणाचे पोलिस महासंचालक बी.एस. संधू यांनी सांगितले. “श्रद्धेच्या नावाखाली हिंसाचार चालू दिला जाणार नाही.’असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही “मन की बात’ या आपल्या मासिक रेडिओ कार्यक्रमादरम्यान सांगितले.

शुक्रवारी पंचकुलातील सीबीआय न्यायालयाच्या परिसरामध्ये हजारो डेरा समर्थक जमा झाले होते. गुरमीत राम रहिम यांना न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर पंचकुलामध्ये झालेल्या जाळपोळ आणि हिंसाचारामध्ये मरण पावलेल्यांची संख्या 38 पर्यंत पोहोचली आहे. त्या हिंसाचाराची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. अफवा आणि प्रक्षोभक संदेश पसरू नयेत, यासाठी मोबाईल इंटरनेट सुविधा अजूनही बंद ठेवण्यात आली आहे.
गुरमीत राम रहिम यांना रोहतकमधील सुनारिया तुरुंगात ठेवण्यात आले आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव तेथेच एक कोर्ट रुम उभारण्यात येणार असून दुपारी 2.30 वाजता तेथेच शिक्षा सुनावली जाणार आहे, असे संधू यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. डेरा सच्चा सौदाचे मुख्यालय सिरसा आणि रोहतक या दोनच जिल्ह्यांमध्ये सध्या संचारबंदी लागू आहे.

सिरसा येथील डेराच्या मुख्यालयामध्ये वेगवेगळ्या राज्यांमधील सुमारे 30 हजार समर्थक आहेत. या सर्वांना प्रशासनाने आश्रम सोडून जाण्याचे वारंवार आवाहन केले. मात्र तरिही या समर्थकांनी आश्रम सोडून जाण्यास नकार दिला आहे. या समर्थकांकडून संभाव्य हिंसाचाराला रोखण्यासाठी लष्कर आणि दंगल प्रतिबंधक पथकाने पोलिसांच्या समवेत आश्रमाला वेढा घातला आहे. सिरसामधील डेरा मख्यालयामध्ये घुसण्याचे आदेश अद्याप लष्कराला मिळालेले नाहीत. मात्र आतील संबंधितांशीही संवाद सुरु असल्याचे समजते आहे.

शिक्षा सुनावली जात असताना कायदा आणि सुव्यवस्थेला सर्वाधिक प्राधान्य असेल. परिस्थितीला हाताळण्यासाठी पोलिसांना निर्णयासाठी “फ्री हॅन्ड’ देण्यात आला आहे, असे हरियाणातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
हरियाणा आणि पंजाबमधील डेराच्या सुमारे 130 पेक्षा अधिक केंद्रांची तपासणी करण्यात आली असून तेथून लोखंडी रॉड, काठ्या, पेट्रोल बॉम्ब आदी शस्त्रे जप्त करण्यात आली आणि यापैकी काही केंद्रांना सील ठोकण्यात आले. सिरसा आश्रमाच्या जवळ एके 47 रायफल आणि पिस्तुलही आढळून आले आहे. शुक्रवारच्या हिंसाचाराची नुकसान भरपाई करण्यासाठी डेराच्या मालमत्तांना सील ठोकण्यात आल्याचे हरियाणा सरकारने म्हटले आहे.

5 सुरक्षा रक्षकांना अटक
गुरमीत राम रहिम यांच्या “झेड प्लस’ सुरक्षेतील 5 सुरक्षा रक्षकांनी गुरमीत राम रहिम यांना तुरुंगात नेण्यापासून पोलिसांना अटकाव केला होता. या सुरक्षा रक्षकांना अटक करण्यात आली आहे. गुरमीत राम रहिम यांना त्यांच्या स्वतःच्या कारमधून नेले जावे, असा या सुरक्षा रक्षकांचा आग्रह होता. मात्र न्यायालयाने दोषी ठरवल्याने पोलिसांच्या वाहनातूनच नेले. या सुरक्षा रक्षकांवर देशद्रोह, हत्येचा प्रयत्न, गुन्हेगारास पळून जाण्यास मदत करणे आणि शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायद्यांतर्गत आरोप ठेवण्यात आले असून हे सर्वजण सध्या पोलिस कोठडीत आहेत, असे पोलिस महासंचालक संधू यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)