राम मंदिर भारतात नाही तर काय पाकिस्तानात बांधणार का ?

भाजपेतर पक्षांच्या काही नेत्यांचाही राम मंदिराला पाठिंबा

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलल्यानंतर अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी कायदा करण्याच्या मागणीने जोर धरला आहे. त्या मागणीसाठी प्रामुख्याने संघ परिवार पुढे सरसावला आहे. अशातच भाजपेतर पक्षांच्या काही नेत्यांनीही राम मंदिर उभारणीला पाठिंबा दर्शवला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कर्नाटकचे माजी मंत्री आणि कॉंग्रेसचे विद्यमान आमदार रोशन बेग यांनी तर भारतात नाही तर काय पाकिस्तानात राम मंदिर बांधणार का, असा सवाल केला आहे. बंगळूरमध्ये पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना बेग यांनी राम मंदिराबाबत अनुकूलता दर्शवली. मुस्लिम समाज हिंदू बांधवांच्या भावनांचा आदर करतो, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी भाजप आणि त्या पक्षाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवरही टीकास्त्र सोडले. काही राज्यांमध्ये सुरू असलेली विधानसभा निवडणुकांची प्रक्रिया आणि लवकरच होणारी लोकसभा निवडणूक या पार्श्‍वभूमीवर भाजपने राम मंदिराविषयी बोलण्यास सुरूवात केली आहे. तो विषय न्यायालयापुढे असताना भाजप अध्यादेशाबाबत बोलत आहे.

मागील साडेचार वर्षे ते काय करत होते? इंधन दरवाढ, नोटाबंदी, जीएसटी, बेरोजगार आदींमुळे जनता त्रस्त आहे. त्यामुळे भाजपकडून राम मंदिराचा मुद्दा पुढे केला जात आहे. निवडणुकांपूर्वी समाजाचे ध्रुवीकरण करण्याचे भाजपने थांबवावे. हिंदू आणि मुस्लिमांनी शांततेने राहावे असे मला वाटते. राम मंदिराचा मुद्दा किती ताणणार, असा सवाल बेग यांनी केला. अयोध्येत राम मंदिर उभारणीला भारतीय मुस्लिमांचा विरोध नसल्याचे वक्तव्य याआधी केल्याचेही त्यांनी यावेळी मान्य केले.

मुलायम यांच्या सूनबाईही अनुकूल
समाजवादी पक्षाचे (सप) संस्थापक मुलायमसिंह यादव यांच्या सूनबाई अपर्णा यांनीही राम मंदिर उभारणीला पाठिंबा दर्शवला आहे. अयोध्येत राम मंदिराची उभारणी व्हायलाच हवी, असे म्हणत अपर्णा यांनी न्याययंत्रणेवर पूर्ण विश्‍वास असल्याचे म्हटले. त्या उत्तरप्रदेशच्या बाराबंकीमध्ये पत्रकारांशी बोलत होत्या. मी भाजपबरोबर नव्हे तर भगवान श्रीरामांसमवेत असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली. त्या मुलायम यांचे पुत्र प्रतीक यांच्या पत्नी आहेत. पुढील वर्षी होणारी लोकसभा निवडणूक त्या प्रगतीशील समाजवादी पक्षाच्या (लोहिया) उमेदवार म्हणून लढवणार आहेत. मुलायम यांचे बंधू शिवपाल यांनी नुकताच तो पक्ष स्थापन केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)