राम मंदिर उभारणीची तारीख सांगा : उद्धव ठाकरे 

मोदी सरकारला आव्हान

अयोध्या – मोठा गाजावाजा झालेल्या अयोध्या दौऱ्यासाठी दाखल झालेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी राम मंदिराच्या मुद्‌द्‌यावरून मोदी सरकारला आव्हान दिले. आता हिंदू स्वस्थ बसणार नाही; प्रश्‍न विचारणारच. मंदिर उभारणीची तारीख सांगा, अशी मागणी त्यांनी सरकारला उद्देशून केली.

सहकुटूंब अयोध्येत दाखल झाल्यानंतर उद्धव यांनी लक्ष्मण किला परिसरात उपस्थितांसमोर भूमिका मांडताना मोदी सरकारला लक्ष्य केले. मी येथे श्रेयवादाच्या लढाईसाठी आलो नाही. तर झोपलेल्या कुंभकर्णाला जागे करण्यासाठी आलो आहे. रामायणातील कुंभकर्ण सहा महिने झोपायचा. हे कुंभकर्ण चार वर्षांपासून झोपलेत.

जे आश्‍वासन जनतेला, हिंदूंना दिले होते त्याची आठवण करून देण्यासाठी आलो आहे. दिलेले आश्‍वासन पूर्ण करणे हेच आमचे हिंदुत्व आहे. आपण सर्व एकत्र येऊन मंदिर निर्माण करू. मला कोणतंही श्रेय नको. मला मंदिर पाहिजे. मंदिर उभारणीसाठी आणखी किती काळ घालवणार? मंदिर वही बनाएंगे, मगर तारीख नहीं बताएंगे हे किती दिवस चालणार, असे सवाल त्यांनी केले.

माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकार आघाडीचे होते. त्यामुळे त्यावेळी मंदिर उभारणीसाठी कायदा बनवणे अवघड होते. मात्र, आताचे सरकार मजबूत आहे. त्यामुळे मंदिरासाठी अध्यादेश आणल्यास शिवसेना नक्की पाठिंबा देईन. श्रद्धेच्या विषयाचा निकाल न्यायालयात लागू शकत नाही.

राम मंदिरासाठी सर्वोच्च न्यायालयाचे कारण पुढे करू नका. नोटाबंदी करताना त्या न्यायालयाला विचारले होते काय? मंदिराची उभारणी साधे काम नाही. त्यासाठी छाती असली पाहिजे. फक्त छाती असून चालणार नाही; त्यात मर्दाचे हृदय असले पाहिजे, असा शाब्दिक टोलाही उद्धव यांनी लगावला. उद्धव यांच्या आगमनापूर्वीच मोठ्या संख्येने शिवसैनिकही महाराष्ट्रातून अयोध्येत दाखल झाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)