कॉंग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांचे टीकास्त्र
“मन की बात, येऊन पहा काम की बात’ पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन
पुणे – धर्म आणि श्रद्धा हे विषय वेगळे असले, तरी त्याला राजकारणाशी जोडण्याचे काम भाजपकडून केले जात आहे. त्यामुळेच राम मंदिरचा मुद्दा पुन्हा उपस्थित करण्यात आला आहे. “मंदिर वही बनाएंगे, पण तारीख नही बताएंगे’ अशी टीका कॉंग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी येथे केली.
“मन की बात, येऊन पहा काम की बात’ या पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन बालगंधर्व कलादालन येथे करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन चतुर्वेदी यांच्या हस्ते मंगळवारी झाले. यावेळी माजी आमदार मोहन जोशी, कॉंग्रेस शहराध्यक्ष रमेश बागवे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
“देवाला जाती-धर्मांमध्ये विभागण्याचे काम या भाजप सरकारने केले आहे. राहुल गांधी हे मंदिरांमध्ये पूर्वीसुद्धा जात होते आणि आतासुद्धा जात आहेत. पण, पूर्वी गेल्याचे माध्यमांमध्ये यायचे नाही, आता ते टीकेच्या स्वरुपात प्रसारित करण्यात येत आहे. आमच्या दृष्टीने मंदिर हा मुद्दा धर्म आणि श्रद्धेचा विषय आहे. त्यामुळे त्याला राजकीय स्वरुप देणे आम्हांला आवडत नाही.’
राममंदिर उभारण्याबाबत विधेयक संसदेत सादर केल्यास कॉंग्रेस पाठिंबा देणार काय? याबाबत चतुर्वेदी म्हणाल्या,”राम मंदिराबाबत भाजपचा हेतू स्वच्छ नाही. आज देशात बेरोजगारी, गरिबीसारखे अनेक प्रश्न आहेत. ते आम्हांला जास्त महत्त्वाचे वाटत आहेत. सरकारविरोधी जनआक्रोश वाढत असून पुढील निवडणुकांमध्ये कॉंग्रेसची सत्ता येणार,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा