राम जन्मला गं सखे…

पिंपरी – सत्‌ सीता रामचंद्र की जय, सिया वर प्रभू रामचंद्र की जय, बोला बजरंगबली की जयच्या जयघोषात अन्‌ रामभक्तांच्या अलोट गर्दीत शहरातील मंदिरांमध्ये रामनवमी उत्सव उदंड उत्साहात साजरा झाला. राम जन्मला गं सखीचा सूर आणि पुष्पवर्षावात प्रभू श्री रामचंद्रांचा जन्मसोहळा मंगलमय वातावरणात पार पडला.

शहरातील बहुसंख्य मंदिरांमध्ये रामजन्माचा उत्सव साजरा केला जातो. यानिमित्त शहरातील मंदिरे विद्युत रोषणाई, फुलांनी सजवण्यात आली होती. रांगोळीचे गालिचे लक्ष वेधत होते. सकाळपासून रामजन्मोत्सवाची सर्वत्र लगबग होती. रविवारची सार्वजनिक सुट्टी आल्याने चाकरमान्यांनीही आवर्जून मंदिरांमध्ये गर्दी केल्याचे पहायला मिळाले. मंदिरांमध्ये अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. टाळ, मृदुंगाच्या गजरात रंगलेल्या भजनी मंडळाच्या सुरावटींनी वातावरण मंगलमय झाले होते. काकड आरती, रामकथा, ज्ञानयज्ञ, होमहवन, पूजा, कीर्तन अशी कार्यक्रमांची रेलचेल होती. रामजन्मासाठी मंदिरांमध्ये आकर्षक सजावट केलेले पाळणे लावण्यात आले होते. रामजन्म होताच महिला वर्गामध्ये पाळणा म्हणण्यासाठी चढाओढ लागली होती. पाळणा गाणाऱ्या महिलांच्या सुरानी वातावरण रामभक्तीने भारावून गेले होते.

वडमुखवाडी येथील साई मंदिरात सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश गावडे यांच्या हस्त मध्यान्ह आरती आणि पुजा करण्यात आली. यावेळी श्री साई सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष नेलगे, विश्वस्त शिवकुमार नेलगे, सदन कमांडचे संचालक संजीवकुमार, बबिता नेलगे, अपर्णा नेलगे आदींसह शेकडो भाविक उपस्थित होते. रामनवमीनिमित्त मंदिरात पहाटे मंगल स्नान, श्रींची काकड आरती, ग्रंथ पारायण, रुद्राभिषेक, सायंकाळी श्रींची पालखी मिरवणूक, साई भक्तीसंगीत व हरी जागर असे धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते धुपारती करण्यात आली.

चिखलीत पालखी मिरवणूक
विश्व श्रीराम सेनेच्या वतीने साने चौक चिखली परिसरात पालखी मिरवणूक काढण्यात आली. पालखीपुढे वारकऱ्यांनी टाळ मृदंगाच्या गजरात प्रभू रामचंद्रांची भजने सादर केली. यावेळी विश्व श्रीराम सेनेचे अध्यक्ष लालबाबू गुप्ता, माजी नगरसेवक सुरेश म्हेत्रे, अजित शितोळे, प्रमोद गुप्ता, प्रियांका गुप्ता, अक्रम शेख, विनोद गुप्ता, शामबाबू गुप्ता, सुनील सिंह, संजय विश्वकर्मा, देवेंद्र पासवान, रामेश्वर गौड, फुलचंद राम, उमेश सिंह, राजकुमार गुप्ता, रोहीत प्रसाद आदी उपस्थित होते. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम झाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)