रामेश्‍वर हे जागतिक कुस्ती केंद्र म्हणून उदयास येईल

– संभाजीराव पाटील निलंगेकर; राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती महा-वीर स्पर्धेचे उद्‌घाटन
पुणे, दि. 19 – रामेश्‍वर येथे होणाऱ्या कुस्ती स्पर्धातून देशाला उत्तम दर्जाचे मल्ल मिळत आहेत. त्यामुळे साऱ्या देशाचे लक्ष येथील कुस्ती स्पर्धेने वेधून घेतले आहे. भविष्यात रामेश्‍वर हे जागतिक कुस्ती केंद्र म्हणून उदयास येईल, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे कामगार, भूकंप पुनर्वसन व कौशल्य विकास मंत्री व लातूरचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी व्यक्‍त केले.
विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने रामेश्‍वर (रुई), ता. जि. लातूर येथे संतश्रेष्ठ श्री एकनाथ महाराज षष्ठीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रधर्म पूजक – दादाराव कराड स्मृती – राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती महा-वीर स्पर्धेच्या उद्‌घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड अध्यक्षस्थानी होते.
यावेळी तीन वेळा महाराष्ट्र केसरी पै. विजय चौधरी, आमदार विनायकराव पाटील, माजी आमदार गोविंद केंद्रे, भाजपा जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, भाजपचे प्रदेश प्रवक्‍ते गणेश हाके, कुस्ती संघटक श्रीकांत देशमुख, नंदू विभूते, बी. बी. क्षीरसागर, वामनराव दाते, रामेश्‍वरचे माजी सरपंच तुळशीराम दा. कराड, काशीराम दा. कराड, माईर्स एमआयटी शिक्षणसंस्था समूहाचे उपाध्यक्ष प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड, माईर्स एमआयटी शिक्षणसंस्था समूहाचे सचिव प्रा. डॉ. मंगेश तु. कराड, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे विलास कथुरे, एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाचे कार्यकारी संचालक श्री. रमेशअप्पा कराड व डॉ. हनुमंत तु. कराड हेही यावेळी उपस्थित होते.
पै. विजय चौधरी म्हणाले की, शिकण्यात गती नही म्हणून कुस्तीकडे मुलांना पालक पाठवतात. तसे न करता शिक्षणाबरोबरच मुलांनी कुस्ती या खेळाकडेही लक्ष द्यावे. आजपर्यंत मी 21 राज्यस्तरीय कुस्त्या खेळलो. रामेश्‍वर येथे कुस्ती खेळण्याचा योग आला नाही, हे माझे दुर्भाग्य होते. पण आज येथे जो माझा सत्कार झाला त्याचा मला अभिमान वाटतो. सर्व मल्लांनी व्यसनापासून दूर रहावे. तालमीमध्ये सुशिक्षित पालकांनी आपल्या पाल्याला पाठवावे. त्यामुळे मुलांची बौद्धिक व शारीरिक असा दोन्ही प्रकारचा विकास होईल. तिहेरी महाराष्ट्र केसरी पै. विजय चौधरी यांना या वेळी वायुपुत्र हनुमान कुस्ती महावीर विशेष गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख 51 हजार रु. असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
शुभारंभाची कुस्ती अमोल घुगे व दीपक कराड यांच्यात झाली. त्यामध्ये दीपक कराड विजयी झाला. तसेच, अश्‍विनी जाधवर आणि प्रिया सूर्यवंशी यांच्यात मुलींची शुभारंभाची कुस्ती झाली. या स्पर्धेत राज्यभरातील शेकडो मल्लांनी भाग घेतला आहे. श्रीकांत देशमुख यांनी प्रास्ताविक केले. प्रा. गोविंद जाधव यांनी सूत्रसंचालन केले. विलास कथुरे यांनी आभार मानले.

फोटो क्र. 4158- विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने रामेश्‍वर (रुई), ता. जि. लातूर येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रधर्म पूजक – दादाराव कराड स्मृती – राज्यस्तरीय महाराष्ट्र कुस्ती महा-वीर स्पर्धा-2017′ च्या उद्‌घाटन प्रसंगी शुभारंभाची कुस्ती लावताना संभाजीराव पाटील-निलंगेकर. डावीकडून प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड, रमेशअप्पा कराड, प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड, पै. विजय चौधरी, श्रीकांत देशमुख व प्रा. डॉ. मंगेश तु. कराड.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)