“राम’मुळे भाजप संकटात; प्रदेशाध्यक्षांनी सीडी मागवली!

राज्यभरात महिलांचा तीव्र संताप : राम कदमांच्या घरावर महिलांचा मोर्चा
मुंबई – एकतर्फी प्रेम करणा-या तरूणाईला संदेश देताना भाजप आमदार राम कदम यांनी केलेल्या पंसत असणा-या मुलीला पळवून आणण्यास मदत करणार “या’ वक्तव्याचे राज्यभरात संतप्त पडसाद उमटले. ठिकठिकाणी राम कदम आणि भाजपाविरोधात महिला व राजकिय पक्षांनी आंदोलन करीत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

दरम्यान, पक्षाच्या आमदारांने उधळलेल्या मुक्ताफळामुळे भाजपाची पुरती अडचण झाली असून प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या भाषणाची सिडी मागवली आहे.त्यामुळे राम मंदिराच्या मुद्यावर निवडणूक लढविणारा भाजप आता “राम’ (कदम)मुळेच संकटात सापडला आहे.

भाजपाचे प्रवक्ते व आमदार राम कदम यांनी आपल्या मतदारसंघात सोमवारी दहिहंडी दिवशी गोंविदांशी बोलताना बेताल बडबड केली.त्यावरून आज राज्यभरात त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

शिवसेना पक्षाप्रमुख उध्दव ठाकरे यांनी देखील कदम यांना छिंदम किंवा परिचारक यांच्याप्रमाणे पक्षातून बेदखल करण्यात यावे आणि कोणत्याही पक्षाने त्याना स्विकारू नये अशी भुमिका जाहीर केली आहे. मुंबई राष्ट्रवादी महिला आणि युवतींनी त्यांच्या घरासमोर जोरदार आंदोलन करत निषेध व्यक्त केला. आमदार विद्या चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मुंबई जोरदार घोषणा देत त्यांच्या अटकेची मागणी केली. कदम यांच्या फोटोला काळे फासत आणि चपलांचा मारा करत आपला संताप व्यक्त केला. यावेळी त्यांच्या घराबाहेर काहीकाळ तणावाचे चित्र निर्माण झाले होते. शिवाय त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी त्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात माहिला कार्यकर्त्यांसह ठिय्या दिला. आमदार कदम हे लोकप्रतिनिधी असून त्यांचे मुली पळवून नेण्याबाबतचे वक्तव्य निषेधार्थ आहे. त्यांच्यावर विधानसभा अध्यक्षांनी कारवाई करावी, अशी मागणी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील महिलांचे भाऊ असतील तर त्यांनी पुढे यावे आणि आमदार राम कदमांनी महिलासंदर्भात केलेल्या वक्तव्याची दखल घेत त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी केली आहे. सत्ता मिळाल्यानंतर चार वर्षातच भाजपला त्यांच्या घोषणेचा विसर पडल्याचे राऊत म्हणाले. भाजपचा नवीन नारा बेटी बचाव बेटी पढाव असा नाही तर बेटी भगाव असा असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
अजित पवार यांनीही राम कदम यांच्या वक्तव्यावर घणाघाती टीका केली आहे.

भाजपाचे आमदार मुलींना पळवून आणण्याची भाषा करत आहेत. मुलींना काही त्यांचे अधिकार आहेत की नाहीत? मुलांना ज्याप्रमाणे जोडीदार निवडण्याचा अधिकार आहे तसाच मुलींना सुद्धा आहे. मुलींना पळवून नेऊ, उचलून घेऊन जाऊ ही कुठली भाषा? फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये यांची असे बोलण्याची हिंमत होतेच कशी? ही घमेंडशाही म्हणायची का? हा भाजपाच्या आमदारांना सत्तेचा आलेला माज म्हणायचा का? चूक झाली तर भारतीय संस्कृतीमध्ये माफी मागण्याची पद्धत आहे. मात्र साधा खेदही व्यक्त न केल्याबद्दल पवार यांनी निषेध व्यक्त केला.

कदम यांची ट्‌विटरवर ‘टिवटिव’

कदम त्यांनी ट्‌विट करुन झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच माझ्या भाषणाची पूर्ण सीडी न पाहता केवळ 54 सेकंदाच्या व्हिडिओवर विरोधकांनी रान उठवले असल्याचा आरोपही कदम यांनी केला. दरम्यान, कदम यांच्या वक्तव्यावर त्यांच्या दहीहंडीला उपस्थित असणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कारवाई का करत नाहीत, असाही सवाल सामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे भाजप पक्षश्रेष्टींवर दबाव वाढत असून कदम यांच्या भाषणाची सिडी प्रदेश कार्यालयाने मागवली असल्याचे बोलले जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)