राममंदिर सुनावणीच्या विलंबसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना कॉंग्रेसकडून धमक्‍या : पंतप्रधान 

 राजस्थानातील सभेत पंतप्रधान मोदी यांचा आरोप 

अल्वार. (राजस्थान) : अयोध्येतील राममंदिराच्या उभारणीला कॉंग्रेसनेच विलंब केला आहे. अयोध्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांना हकालपट्टी करण्याची धमकी कॉंग्रेसने दिली होती, असा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केला.

भारतमातेपेक्षा सोनिया गांधी श्रेष्ठ…! 
काही दिवसांपूर्वी “भारत माता की जय’ घोषणा देणाऱ्यांना कॉंग्रेसच्या उमेदवाराने थांबवले होते आणि नंतर कार्यकर्ते “सोनिया गांधी की जय’ अशा घोषणा देऊ लागले होते, असा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्याचा संदर्भ देऊन पंतप्रधानांनी कॉंग्रेसला भारत मातेपेक्षा सोनिया गांधी अधिक मोठ्या वाटतात, असा आरोप केला. अल्वार जिल्ह्यातील विधानसभेच्या 11 मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे या देखील पंतप्रधानांच्या सभेच्यावेळी उपस्थित होत्या. 

या प्रकरणाच्या सुनावणीला 2019 च्या लोकसभा निवडणूकांपर्यंत विलंब व्हावा म्हणून वकिल असलेल्या कॉंग्रेसच्या राज्यसभेतील सदस्याने सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना धमकावले होते, असे मोदी म्हणाले. मात्र त्यांनी कोणाही नेत्याच्या नावाचा उल्लेख केला नाही. कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील सात विरोधी पक्षांनी तत्कालिन सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांची हकालपट्टी करण्याची नोटीस यावर्षी एप्रिलमध्ये दिली होती. सरन्यायाधीशांवर गैरवर्तन आणि अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र राज्यसभेचे अध्यक्ष, उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी ही नोटीस फेटाळली होती. सरन्यायाधीशांच्याविरोधातील हे प्रकरण संशय आणि तर्काच्या आधारे करण्यात आले होते, असेही पंतप्रधानांनी सांगितले.

कॉंग्रेसला लोकशाही आणि न्यायपालिकेबद्दल अजिबात प्रेम नाही. कॉंग्रेसने कोणतीही चर्चा न करता संसदेचे कामकाजही रोखून धरले होते. आता कॉंग्रेसकडून धोकादायक खेळ खेळला जात आहे. तो प्रयत्न हाणून पाडला गेला पाहिजे.
सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या प्रकरणाच्या निकालासाठी कोणतीही कालमर्यादा निश्‍चित केलेली नाही. मात्र सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना धमकावून कॉंग्रेस मात्र अयोध्येच्या या संवेदनशील आणि गंभीर विषयावरील सुनावणीचे राजकारण करत आहे. राज्यसभेतील संख्याबळाच्या आधारे न्यायपालिकेवर दबाव आणण्याचा प्रयत्न कॉंग्रेसकडून केला जात आहे, असा आरोपही पंतप्रधानांनी केला.

विरोधी पक्षांना विकासाबाबत बोलण्याचे धाडस नाही. म्हणून ते मोदींच्या जातीबाबत बोलत आहेत. अशी टीकाही पंतप्रधानांनी केली. माजी केंद्रीय मंत्री आणि कॉंग्रेसचे उमेदवार सी.पी. जोशी यांनी पंतप्रधानांच्या जातीबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले होते. त्यासंदर्भाने मोदी बोलत होते. दलित आणि मागासवर्गीयांबाबत कॉंग्रेसने भेदभाव केला. कॉंग्रेससाठी दलित म्हणजे केवळ मतपेढी आहे. डॉ. आंबेडकरांना त्यांच्या निधनानंतर 34 वर्षांनी भारतरत्न किताबाने मरणोत्तर गौरवण्यात आले. डॉ. आंबेडकरांचा कॉंग्रेसला विसर पडला असल्याची टीकाही त्यांनी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)